बाजार समितीसाठी जयंतराव विरोधक एकत्र
By admin | Published: June 24, 2015 12:19 AM2015-06-24T00:19:25+5:302015-06-24T00:41:16+5:30
मिरज पश्चिममधील स्थिती : वसंतदादा घराण्यातील फुटीचा परिणाम; इच्छुकांची संख्या वाढली
सोमनाथ डवरी - कसबे डिग्रज -सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. स्थापनेपासूनच या समितीवर मिरज पश्चिम भागाचे सातत्याने वर्चस्व राहिले आहे. पूर्वी सांगली आणि आता इस्लामपूर विधानसभा धोरण ठेवून मिरज पश्चिम भागात बाजार समितीची मोर्चेबांधणी सुरू आहे.
मात्र परिसरातील आ. जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांचे एकत्रिकरण सुरू आहे. पण सध्या विशाल पाटील गट आणि मदन पाटील गट फुटीचा परिणाम दिसत आहे. १०० टक्के जयंतराव विरोधी सोसायटी व ग्रामपंचायत असलेली समडोळी गाव केंद्रबिंदू आहे.
बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीचे संचालक मतदार असतात. पूर्वी या गटातून ठराव घेणारे सभासद निवडणुकीस पात्र ठरत होते. मात्र सध्या जे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि सोसायटी संचालक आहेत, तेच मतदार आणि तेच उमदेवार ठरणार आहेत. त्यामुळे गावोगावच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना बाजार समिती उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. काही वरिष्ठ नेते आपापल्या ‘सुपुत्रासाठी’ फिल्डिंग लावताना दिसत आहेत.
सध्या ही निवडणूक कॉँग्रेसविरोधी आ. जयंतराव पाटीलप्रणित राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, माजी मंत्री मदन पाटील गट अशी होण्याची चिन्हे दिसत आहेत. पण मिरज पश्चिम भागात विशाल पाटील, प्रतीक पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राहुल महाडिक समर्थक, पृथ्वीराज पवार, भीमराव माने यांचा शिवसेनेचा गट असे एकत्रिकरण सुरू आहे. या परिसरातील साधारणपणे सर्वत्र सोसायटी, ग्रामपंचायतींवर जयंत पाटील विरोधक सत्तेत आहेत. याची सुरुवात समडोळीतून झाली होती. समडोळीचे नेते महावीर चव्हाण हे आघाडीचे इच्छुक उमेदवार आहेत.
सध्याच्या स्थितीत समडोळी ग्रामपंचायत आणि सोसायटीवर स्वाभिमानी आघाडीची निर्विवाद सत्ता आहे. कवठेपिरानमध्ये भीमराव माने यांचा शब्द अंतिम आहे. दुधगावमधील सोसायटी राष्ट्रवादी विरोधी गटाकडे आहे. सावळवाडी, माळवाडीमध्ये सोसायटीमध्ये एकच सदस्य राष्ट्रवादीचा आहे, तर ग्रामपंचायतीवरही खा. राजू शेट्टी समर्थकांचे वर्चस्व आहे. कसबे डिग्रज ग्रामपंचायतीवर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत आहे. पण वर्चस्व खा. प्रकाशबापू पाटील समर्थकांचे आहे. जे खा. राजू शेट्टीचे नेतृत्व मानतात.
मौजे डिग्रजमध्ये ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे, तर सोसायटी कॉँग्रेसकडे आहे. तुंगमध्ये ग्रामपंचायत विशाल पाटील, तर सोसायटी राष्ट्रवादीकडे आहे. एकंदरीत या परिसरात आ. जयंत पाटील यांचे समर्थक अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत. पण खा. राजू शेट्टी, विशाल पाटील, प्रतीक पाटील, भीमराव माने, संभाजी पवार यांच्यासह महाडिक गटानेही या परिसरात ‘वनश्री’ पतसंस्थेच्या माध्यमातून मोर्चेबांधणी केली आहे. युवा नेते राहुल महाडिक यांनी संपर्क वाढविला आहे. त्यांच्या ऐकण्यातील काही मतदार बाजार समितीसाठी आहेत.
यामुळे मिरज पश्चिम भागात सध्या तरी जयंत पाटील विरोधक एकदिलाने एकत्र आल्यास त्यांचे मोठे आव्हान उभे राहू शकते. त्याचबरोबर इच्छुकांची संख्याही मोठी आहे. याचा फटका बसणार आहे. जयंत पाटील हे बेरजेचे गणित मांडणारे नेते आहेत. हे जिल्हा बॅँकेच्या निकालावरून दिसून आले आहे. मिरज पश्चिम भाग या इस्लामपूर विधानसभेच्या परिसरासाठी ते नियोजन करतील. राष्ट्रवादीच्या इच्छुकांनीही साहेबांच्या दौऱ्यात भेटी घेतल्या आहेत.
मोर्चेबांधणीला वेग
आ. जयंत पाटील यांचे समर्थक अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत. पण खा. राजू शेट्टी, विशाल पाटील, प्रतीक पाटील, भीमराव माने, संभाजी पवार यांच्यासह महाडिक गटानेही या परिसरात ‘वनश्री’ पतसंस्थेच्या माध्यमातून मोर्चेबांधणी केली आहे.