जयंतराव व माझी चर्चा नाही : कदम
By admin | Published: July 8, 2015 11:53 PM2015-07-08T23:53:24+5:302015-07-08T23:53:24+5:30
बाजार समिती निवडणूक : मदनभाऊंनी सोबत यायचे की नाही हे ठरवावे!
सांगली : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्याशी आपली कसलीही चर्चा झालेली नाही. विक्रम सावंत यांनाही आपण चर्चेसाठी कधी पाठविलेले नाही, असे सांगत काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांनी बुधवारी जयंतरावांशी आघाडीची शक्यता फेटाळून लावली.
बाजार समितीबाबत जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्याबद्दल कदम यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मी कशाला चर्चा करू. जयंत पाटील यांच्याशी कसलीही चर्चा झालेली नाही. एका कार्यक्रमात आमची भेट झाली होती. पण तिथेही निवडणुकीवर चर्चा झाली नाही. जतचे विक्रम सावंत यांना आपण त्यांच्याकडे पाठविलेले नाही. या साऱ्या अफवा आहेत.
माजी मंत्री मदन पाटील यांच्या भूमिकेबद्दल कदम म्हणाले की, त्यांनी काँग्रेससोबत रहायचे का नाही, हे ठरवावे. मध्यंतरी मिरजेतील जागांबाबत मदनभाऊ व विशाल पाटील यांनी एकत्रित निर्णय घेण्याची सूचना केली होती, पण त्यानंतर काय झाले, हे मला माहीत नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा विषय संपलेला आहे. आम्ही बाजार समितीची निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे लढविणार आहोत. जे सोबत येतील, त्यांनाही बरोबर घेऊ. कोणी कुठे जायचे, ते त्यांनीच ठरवावे, असा टोलाही लगाविला.
राज्यातील भाजप सरकारवर टीका करीत कदम म्हणाले की, राज्यातील जनतेचा कल बदलू लागला आहे. मोदींची लाट संपली आहे.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील निकाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. येत्या पावसाळी अधिवेशनातही काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित सरकारच्या कारभारावर हल्ला चढविणार आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा झाली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद, जिल्हा बॅँकेत लक्ष घालू
जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी बँकेत पतंगरावांनी यावे, असे निमंत्रण दिले होते. त्याबद्दल छेडले असता, कदम म्हणाले की, जिल्हा बँक ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. बँकेच्या कारभाराची कधीही माहिती घेऊ शकतो. कर्जप्रकरणावरून काँग्रेसच्या संचालकांनी विरोध केला आहे. त्याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांकडून माहिती घेणार आहोत. केवळ जिल्हा बँकच नव्हे, तर जिल्हा परिषदेतही यापुढे लक्ष घालणार असल्याचे ते म्हणाले.
आनंदच आहे...
जत तालुक्यातील ४२ गावांतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सत्ताधारी आमदार, खासदारच सहभागी झाले होते. त्यांनीच सरकारविरोधात मोर्चा काढला. हा आनंदच आहे. त्यातून जिल्ह्याला काहीतरी मिळावे, असा टोला लगाविला.