जयंतराव, आमचा लंगोटा जाईल, पण तुमचं काय जाईल ते पहा!
By admin | Published: January 4, 2017 10:59 PM2017-01-04T22:59:22+5:302017-01-04T22:59:22+5:30
सदाभाऊ खोत : आमच्यावरचे आरोप अज्ञानातून
इस्लामपूर : सत्तेच्या माध्यमातून लोकांना वेठीस धरण्याचे दिवस संपलेले आहेत. तुम्ही तुमच्या आणि आम्ही आमच्या जागेवर योग्य आहोत. प्रत्येकाचा ‘कार्यक्रम’ करायची तुम्हाला सवय आहे. मात्र जयंतराव, याद राखा, आमच्याकडे लंगोटा आहे, तेवढाच जाईल. तुमचे काय जाईल, ते मी आत्ताच सांगणार नाही, अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांना बुधवारी येथे प्रत्युत्तर दिले.
जयंत पाटील यांनी खोत यांच्यावर केलेल्या आरोपांना खोत यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तरे दिली.
ते म्हणाले की, मी राजारामबापूंना मानणारा कार्यकर्ता आहे. जयंतराव राजकारणात येण्यापूर्वी मी बापूंजवळ काम केले आहे. बापूंविषयी मला आजही आदर आहे. बापूंची बरोबरी कोण करीत असेल तर ते योग्य नाही. त्याला माझा विरोधच असेल. बापूंनी हयातीत कोठेही स्वत:चे नाव दिले नाही. वाळवा पंचायत समिती सभागृहाला वसंतदादांचे नाव दिले गेले, मात्र तेव्हा त्यांनी ते बदलले नाही. त्यामुळे जयंतरावांनी केलेला आरोप त्यांचे अज्ञान दाखवून देणारा आहे.
ते म्हणाले की, जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने आणि शिफारशीने मी मंत्री झालो, असे त्यांना वाटत असेल तर त्यांचे अभिनंदन करतो. अजूनही बरेचजण मंत्रीपदासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासाठीही त्यांनी शब्द टाकला, तर बरे होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझी ओळख त्यांच्यामुळेच झाली. त्यांचे मुख्यमंत्र्यांशी एवढे चांगले संबंध असतील, तर जयंत पाटील अजून का मंत्री झाले नाहीत, याचे आश्चर्य वाटते. जिल्ह्यात कोणीही आमदार निवडून आला की आपल्यामुळेच आला, असे म्हणायची त्यांना सवय लागली आहे.
राजकारण व्यक्तीद्वेषाने भरलेले असू नये, ते समाजहिताचे असावे. सत्ता कायम नसते, हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, ही आठवण तुम्हाला राहिली असती तर १५ वर्षात राज्याचा कायापालट झाला असता. एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसती. आता भाज्यांचे भाव पडले म्हणतात, मग १५ वर्षात भाज्यांचे भाव पडणार नाहीत अशी व्यवस्था तुम्ही केली होती का? ती केली असती तर शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली नसती. मला मिळालेले मंत्रीपद कायमचे की तात्पुरते हे मला माहीत नाही. लोकशाहीत तुमच्यासारख्या प्रस्थापितांना धक्का बसू शकतो आणि माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मंत्री होतो, एवढे मात्र सिध्द झाले.
आगामी निवडणुकीत सर्व विरोधकांना टक्कर द्यावी लागणार आहे, हे त्यांनी ओळखले आहे. त्यामुळे त्रासलेला माणूस जशी आदळआपट करतो, तशी अवस्था सध्या जयंतरावांची झाली आहे. राजकारणाचा सातबारा आपला नाही, हे समजले तरी पुरेसे आहे, असे ते म्हणाले. (वार्ताहर)
पुढची २५ वर्षेही राजू शेट्टी यांच्यासोबतच
खासदार राजू शेट्टींशी पटत नसल्याच्या आरोपावर खोत म्हणाले की, काही नसताना आम्ही दोघे २५ वर्षे एकत्र राहिलो आहोत. आज जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे पुढची २५ वर्षे दोघे बरोबर राहू. आमच्यामध्ये दुही निर्माण व्हावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले. त्यांना यश आलेले नाही. माझ्या कामाची पोहोचपावती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी मारला.
संभ्रम निर्माण करण्याचे जुने तंत्र
इस्लामपूरच्या निवडणुकीत जनतेने केलेला बदल जयंतरावांना रुचलेला नाही. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे जुने तंत्र ते वापरत आहेत. मला आमदार, मंत्री करण्यासाठी जेवढी शक्ती खर्च केली, तेवढी शक्ती जवळच्या कार्यकर्त्यासाठी खर्च करून त्याला आमदार केले असते तर, पुण्य लाभले असते, असा टोलाही खोत यांनी लगावला.