जयंतराव-पतंगराव एकत्र

By admin | Published: February 26, 2017 12:43 AM2017-02-26T00:43:41+5:302017-02-26T00:43:41+5:30

भाजपला शह देण्याची रणनीती : जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी हालचाली गतिमान

Jayantrao-Patangrao together | जयंतराव-पतंगराव एकत्र

जयंतराव-पतंगराव एकत्र

Next

सांगली : जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना शनिवारी कलाटणी मिळाली. सर्वाधिक जागा पटकावणाऱ्या भाजपने सत्तेसाठी तयारी सुरू केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम व जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी आघाडीची मोट बांधून आवश्यक संख्याबळ गाठण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.
जिल्हा परिषदेतील ६० पैकी २५ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी त्यांना अजून सहा जागांची आवश्यकता आहे. वाळवा तालुक्यातील रयत विकास आघाडीच्या चार जागाही आपल्याच असल्याचा दावा भाजपने आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला असला तरी या आघाडीतील नानासाहेब महाडिक गटाने भाजपशी बांधील नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही भाजपला पाठिंबा देण्यास विरोध केला आहे. त्यांच्या संघटनेकडेही जिल्हा परिषदेचा एक सदस्य आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या गटाने तीन जागा जिंकल्या असून, त्यांनी अजून पत्ते खुले केलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.
या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी आघाडी बनविण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादीकडे १४, तर काँग्रेसकडे १० सदस्य आहेत. बागणीतून निवडून आलेले अपक्ष संभाजी कचरे मूळ जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने दोन जागा जिंकल्या असून त्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिरज पश्चिम भागात काँग्रेसशी आघाडी केली होती. रयत विकास आघाडीतील वैभव नायकवडी गटाशी आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याशी पतंगराव कदम व मोहनराव कदम यांची जवळीक आहे. ही सर्व गोळाबेरीज केली तर ३२ सदस्यसंख्या गाठून सत्तेपर्यंत पोहोचता येते, असे आडाखे बांधून जयंत पाटील आणि कदम बंधूंनी हालचाली सुरू केल्याचे समजते. त्यांच्यामध्ये तशी चर्चा झाली आहे. वैभव नायकवडी आणि आ. बाबर यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी मोहनराव कदम यांच्यावर देण्यात आली आहे.
मोहनराव कदम यांचा पुढाकार
भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे चुलतबंधू संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. देशमुख आणि कदम गटाचे हाडवैर सर्वश्रुत आहे. पतंगराव कदम यांचा स्वत:चा विधानसभा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या आठपैकी केवळ एक जागा कदम गटाला जिंकता आली आहे. संग्रामसिंह देशमुख जर अध्यक्ष झाले, तर भविष्यात कदम गटाला आणखी मोठा धोका संभवतो. त्यामुळेच भाजपला शह देण्यासाठी कदम बंधूंनी हालचालींना सुरुवात केल्याचे बोलले जाते.
एकत्र बसून निर्णय
शनिवारी सायंकाळी पेठनाका येथे रयत विकास आघाडीची बैठक झाली. खा. राजू शेट्टी, आ. शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सी. बी. पाटील, राहुल महाडिक बैठकीस उपस्थित होते. मंत्री सदाभाऊ खोत अनुपस्थित होते. रयत आघाडीचे सगळे नेते एकत्र बसून पाठिंब्याचा निर्णय घेतील, असे ठरल्याचे सांगण्यात आले.
पृथ्वीराज देशमुख यांची महाडिकांकडे धाव
रयत आघाडीची बैठक झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सायंकाळी पेठनाक्याकडे धाव घेतली. तेथील पॉलिटेक्निकमध्ये नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक यांच्यासह आ. शिवाजीराव नाईक आणि सी. बी. पाटील यांची त्यांनी भेट घेतली. देशमुख यांच्याकडून महाडिक यांचे मन वळविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Jayantrao-Patangrao together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.