जयंतराव-पवारांचा सामना
By admin | Published: June 2, 2017 11:29 PM2017-06-02T23:29:38+5:302017-06-02T23:29:38+5:30
जयंतराव-पवारांचा सामना
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कारंदवाडी येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील व माजी आमदार संभाजी पवार गट आमने-सामने येणार आहेत. दोन्ही गटाकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, शेवटच्या दिवशीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कारंदवाडी येथील सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून एकेकाळचे कट्टर समर्थक आता विरोधक बनले आहेत. सध्या हा कारखाना राजारामबापू साखर कारखान्याच्या ताब्यात आहे. याबाबत न्यायालयीन दावेही सुरू आहेत. त्यातच सर्वोदय कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना गती आली आहे. कारखान्याच्या मतदार यादीवरूनही दोन्ही गटात वाद झाला होता. पण त्याचा निकाल लागताच निवडणुकीचे वेध लागले होते.
आष्टा, नरवाड, हरिपूर, बावची, तुंग या गटात कारखान्याचे सभासद विखुरलेले आहेत. पूर्वी कारखाना कार्यक्षेत्रातील आणि मिरज पश्चिम भागातील गावे संभाजी पवार यांच्या मतदार संघात होती. आता ती जयंतरावांच्या मतदार संघात आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. सध्या वाळवा तालुक्यात जयंत पाटील विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकत्र आहेत. त्याचा फायदा उचलण्याचा पवार गटाचा प्रयत्न राहील. पवार गटाची धुरा अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यावर आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वीच गटनिहाय बैठका व सभासदांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यातून लवकरच उमेदवारांची यादीही तयार केली जाणार आहे. कारखान्याची मालकी सभासदांच्या हाती राहावी, या मुद्द्यावर पवार यांनी जोर दिला आहे.
दुसरीकडे कार्यक्षेत्रात जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. आष्टा, बावची, तुंग, समडोळी या परिसरात जयंतरावांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. त्या जोरावर या निवडणुकीत उतरण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी चालविली आहे. पण अद्यापपर्यंत जयंत पाटील यांच्याकडून कोणताच आदेश आलेला नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ६ जून आहे. त्यात रविवार वगळता केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहतो. त्यामुळे सोमवार व मंगळवारी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
विलासराव शिंदे गटाची भूमिका महत्त्वाची
आष्टा परिसरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार विलासराव शिंदे यांचे वर्चस्व आहे. सध्या शिंदे गट जयंतरावांवर नाराज आहे. त्यांचे चिरंजीव वैभव यांनी नुकताच भाजपप्रवेश केला आहे. त्यामुळे उट्टे काढण्याची खेळी शिंदे गटाकडून होऊ शकते. शिवाय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, काँग्रेसचे नेते नानासाहेब महाडिक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची भूमिकाही या परिसरात निर्णायक आहे. त्यामुळे या जयंतराव विरोधकांकडून संभाजी पवार गटाला बळ मिळणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.
सात अर्जांची विक्री
सर्वोदय साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू झाली. दिवसभरात दोन्ही गटाकडून सात अर्ज नेण्यात आले आहेत. सर्वसाधारण गटासाठी एक हजार, तर इतर गटासाठी तीनशे रुपये अनामत आहे.