जयंतराव-संभाजी पवार गटातील संघर्ष पेटणार-: निवडणुकीच्या तोंडावर कोंडी करण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:31 AM2019-02-08T00:31:11+5:302019-02-08T00:32:23+5:30
सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व माजी आमदार संभाजी पवार यांच्यात संघर्ष पेटणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा
सांगली : सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व माजी आमदार संभाजी पवार यांच्यात संघर्ष पेटणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जयंतरावांची कोंडी करण्याचा डाव आखला जात आहे. हा चक्रव्यूह जयंतराव कसे भेदतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कारंदवाडी येथील सर्वोदय साखर कारखान्यावरून जयंत पाटील-संभाजी पवार यांच्यात उघड संघर्ष झाला. अखेर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्याने सर्वोदयचा ताबा घेत संभाजी पवार गटाला दूर केले. त्याचे राजकीय पडसादही जिल्ह्यात उमटले. राजारामबापूंचे शिष्य असलेल्या संभाजी पवारांचे राजकीय भवितव्यच पणाला लागले होते. त्यात भाजपनेही पवार यांना डावलल्याने राजकीय पटलावर त्यांची पिछेहाट झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली, खरी पण ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले. त्यानंतर सांगली विधानसभा मतदारसंघातून पवार गटाचे अस्तित्व धोक्यात आले.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही पवार गटाने स्वतंत्र आघाडी मैदानात उतरवली होती. पण त्यातही यश आले नाही. कधी काही महापालिकेच्या सत्तेची सूत्रे स्वत:कडे राखणाºया पवार गटाला महापालिकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. या गटाचे सारे शिलेदार मोठ्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे पवार गट राजकीयदृष्ट्या अज्ञातवासात गेला होता. तरीही सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्काचा लढा शासन व न्यायालयीन पातळीवर सुरूच होता.
त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आ. जयंत पाटील यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. त्यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपविरोधात रान पेटविण्यास सुरुवात केली. परिवर्तन यात्रेच्यानिमित्ताने राज्यभर पाटील यांनी दौरा सुरू केला आहे. भाजपच्या कारभारावर ते तुटून पडत आहेत. अशावेळी सर्वोदय कारखान्याच्या मालकी हक्कावरून झालेल्या जखमेवरील खपली काढण्याचे काम शासनाने केले. सर्वोदय व राजरामबापू कारखान्यातील करारच शासनाने रद्द केला. शिवाय सर्वोदयच्या सात-बारा उताºयावरील राजारामबापू कारखान्याचे नावही हटविले. त्यामुळे सर्वोदयवरील पवार गटाच्या हक्काला अधिक बळ मिळाले आहे. सध्या राजारामबापू कारखान्याने शासनाच्या निर्णयाला स्थगिती घेतली आहे.
शासनाच्या या निर्णयाला राजकीय किनार असल्याचीही चर्चा सुरू आहे. इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असून, संभाजी पवार यांना बळ देऊन जयंत पाटील यांच्याविरोधात ‘पवारास्त्र’ वापरले जाणार आहे.
संभाजी पवार सक्रिय : चर्चेला उधाण
गेली तीन ते चार वर्षे राजकीय अज्ञातवासात असलेले संभाजी पवार गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय झाले आहेत. विशेषत: त्यांनी जयंतरावांच्या इस्लामपूर मतदारसंघातील तुंग, कसबेडिग्रज या परिसरात बैठकाही घेतल्या. सर्वोदय साखर कारखान्यावर जाऊन आपले कार्यालय तयार ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. सध्या ते दररोज सर्वोदयवर जात असल्याचे समजते. आपण भाजप सोडलेली नाही आणि भाजपने आपल्याला पक्षातून काढलेले नाही, असे वक्तव्यही त्यांनी मध्यंतरी केले होते. त्यामुळे ते पुन्हा भाजपसाठी सक्रिय होतील, अशी चर्चा आहे. त्यातच राज्य शासनानेही सर्वोदयबाबतचा निर्णय त्यांच्या बाजूने दिल्याने पवारांना बळ मिळणार आहे. त्यांचे सक्रिय होणे व सर्वोदयचा निर्णय यामागचे गणित काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.