जयंतरावांना चांगल्या कल्पना सुचतात!
By admin | Published: April 22, 2016 10:59 PM2016-04-22T22:59:01+5:302016-04-23T01:02:53+5:30
सदाभाऊ खोत : राज्य लोकसेवा आयोग परीक्षार्थी वयोमर्यादा वाढीचा श्रेयवाद
अशोक पाटील--इस्लामपूर --राज्य लोकसेवा आयोगााच्या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्याचे श्रेय माजी मंत्री, आमदार जयंत पाटील लाटत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला. १५ वर्षाहून अधिक काळ सत्तेत असताना जयंतरावांना हे का सुचले नाही? आता विरोधी गटनेते झाल्यानंतर दुसऱ्यांचे श्रेय लाटण्याच्या कल्पना सुचू लागल्याचा उपहासात्मक टोलाही त्यांनी मारला.
खोत म्हणाले की, जुलै २0१५ मध्ये सांगली येथे विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मला भेटले. त्यांनी राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी खुल्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्याविषयी निवेदन दिले होते. या निवेदनावर ३ सप्टेंबर रोजी पुणे येथील विश्रामगृहावर राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत बसणारे विद्यार्थी आणि खासदार राजू शेट्टी, रवींद्र तुपकर, अॅड. योगेश पांडे यांच्यासमवेत बैठक झाली. त्यावेळी या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे पांडुरंग शिंदे, किरण निभोरे, जितू आडलेकर, सागर झाडे यांच्यासह ५0 विद्यार्थी उपस्थित होते.
या बैठकीनंतर ११ सप्टेंबर २0१५ रोजी पुणे येथे विद्यार्थी हक्क परिषद घेण्याचा निर्णय झाला. या परिषदेचे नियोजन करण्यासाठी आमदार विनायक मेटे, आमदार महादेव जानकर, खासदार रामदास आठवले, सदाभाऊ खोत यांची नागपूर येथेही बैठक झाली. त्यानंतर ११ सप्टेंबर २0१५ रोजी पुणे येथील बालगंधर्व मंदिरात विद्यार्थी हक्क परिषद घेण्यात आली. गिरीश बापट, खासदार राजू शेट्टी, आमदार विनायक मेटे, अविनाश महातेकर आदी नेत्यांच्या उपस्थितीत ही परिषद झाली. त्यावेळी गिरीश बापट यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले होते.
याचदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या खुल्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवू, असे आश्वासन दिले होते. तसे लेखी पत्रही खा. शेट्टी यांना दिले होते. ३ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत बैठक झाली. येथे ठोस असा निर्णय न झाल्याने ७ नोव्हेंबरला स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने शनिवार वाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चानंतर ३१ जानेवारी २0१६ रोजी वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. याची माहिती मी स्वत: पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दिली होती. आता तीन महिन्यांनी आमदार जयंत पाटील यांना जाग आली असून, आपणच सरकारकडे पाठपुरावा करुन वयोमर्यादेचा प्रश्न मार्गी लावल्याचा कांगावा त्यांच्याकडून सुरू आहे. जयंतरावांना विरोधी बाकावर बसल्यानंतरच अशा चांगल्या कल्पना सुचतात, हे या घटनेवरुन स्पष्ट झाल्याचेही खोत यांनी सांगितले.
सत्काराचे नियोजन...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढविल्याने उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे इस्लामपूर शहरात त्यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार घेण्याचे नियोजन सुरु असल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.