जयंतराव, विश्वजित निश्चित; गृह, महसूल, अर्थपैकी महत्त्वाचे खातेची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 03:29 PM2019-11-28T15:29:28+5:302019-11-28T15:36:50+5:30
जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचे मंगळवारीच निश्चित झाले आहे. त्यासोबत त्यांना कोणकोणती खाती मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गृह, महसूल, अर्थ यापैकी महत्त्वाचे खाते त्यांना मिळण्याची शक्यता आहे.
सांगली : राज्यात शिवसेना-कॉँग्रेस-राष्टवादीच्या महाराष्ट विकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असून, जिल्ह्यातील तिघांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, कॉँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले असून, शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांनाही मंत्रिपद मिळण्याचे संकेत आहेत.
जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचे मंगळवारीच निश्चित झाले आहे. त्यासोबत त्यांना कोणकोणती खाती मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गृह, महसूल, अर्थ यापैकी महत्त्वाचे खाते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. इस्लामपूर मतदारसंघातून ते सातव्यांदा निवडून आले असून, १९९९ पासून सलग १५ वर्षे ते मंत्री होते. कॉँग्रेसचे विश्वजित कदम पलूस-कडेगाव मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले असून, राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्यांमध्ये ते दुस-यास्थानी आहेत.
पक्षीय संघटनांमध्ये अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. वडील दिवंगत माजी मंत्री पतंगराव कदम यांची कार्यपद्धती त्यांनी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे त्यांनाही थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्यभरातील त्यांच्या समर्थकांनी ताकद लावली आहे. राष्टवादी व कॉँग्रेस आघाडीचे सरकार असताना, सातत्याने जिल्ह्याला तीन-चार मंत्रिपदे मिळाली असल्याने त्यांची दावेदारी वाढली आहे.
जिल्ह्यात अनिल बाबर शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. शिवसेनेकडून ते दुस-यांदा विधानसभेत गेले आहेत. खानापूर मतदारसंघातून ते पाचव्यांदा निवडून आले आहेत. तेही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.