जयंतरावांची एकाधिकारशाही मोडीत काढली : सदाभाऊ खोत
By admin | Published: February 23, 2017 07:18 PM2017-02-23T19:18:38+5:302017-02-23T19:18:38+5:30
राजू शेट्टींना शुभेच्छाच!
सांगली : वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या एकाधिकारशाहीचे राजकारण मोडीत काढण्यासाठी रयत विकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या ताकदीने निवडणूक लढविली. आघाडीने जिल्हा परिषदेच्या वाळवा तालुक्यातील चार व कवठेपिरानची एक अशा पाच जागा, तर पंचायत समितीच्या आठ जागा जिंकल्या. बागणीमध्ये सागर खोत यांचा केवळ १२० मतांनी निसटता पराभव झाला. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
ते म्हणाले की, जयंत पाटील यांनी बागणीची जागा प्रतिष्ठेची केली होती. मात्र तरीही तेथे राष्ट्रवादीचा पराभव झाला. राष्ट्रवादीचा बंडखोर उमेदवार निवडून आला. जयंत पाटील यांना माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव शिंदे यांचा ठरवून पराभव करायचा होता. बागणीमध्ये त्यांनी केवळ शिंदे गटाची सहानुभूती मिळवण्यासाठीच नाटकी आंदोलन केले होते. राष्ट्रवादीने बागणीमध्ये प्रामाणिकपणे काम केले असते तर, बंडखोर उमेदवार निवडून आला नसता. मात्र जयंत पाटील गटाने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करुन पुन्हा कूटनीतीचा प्रत्यय दिला. जयंत पाटील यांना कुठलाही पराभव सहन होत नाही, त्यामुळेच वाळव्यात आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यावर गोळीबार केला गेला.
माझा मुलगा सागर खोत याने दुसऱ्या मतदारसंघात जाऊनही चांगली लढत दिली. त्याचा निसटता पराभव झाला. सांगली जिल्हा परिषदेत भाजप, रयत विकास आघाडी आणि मित्र पक्ष यांची सत्ता स्थापन करणार आहोत.
राजू शेट्टींना शुभेच्छाच!
खासदार राजू शेट्टी यांनी आयुष्यभर तत्त्वाचा मुलामा देऊन राजकारण केले. या निवडणुकीतही त्यांनी तत्त्वाचे राजकारण केले. अशाप्रकारच्या भविष्यकालीन राजकारणाच्या वाटचालीला खासदार शेट्टी यांना माझ्या शुभेच्छाच आहेत, अशी खोचक प्रतिक्रियाही खोत यांनी दिली.