‘वसंतदादा’ला मदतीचे आदेश जयंतरावांचे
By admin | Published: April 23, 2017 11:52 PM2017-04-23T23:52:49+5:302017-04-23T23:52:49+5:30
दिलीपतात्या पाटील : कारखान्याबाबत सूडबुद्धीचे राजकारण नसल्याचे स्पष्टीकरण
सांगली : वसंतदादा साखर कारखाना ताब्यात घेऊन आम्ही सूडबुद्धीचे राजकारण करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक वसंतदादा कारखाना चालू राहण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश मला आ. जयंत पाटील यांनीच दिले होते, अशी माहिती सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात दिली. कामगार नेते आर. बी. शिंदे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त वसंत कामगार भवनात कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी दिलीपतात्या बोलत होते.
दिलीपतात्या म्हणाले की, वसंतदादा कारखाना ताब्यात घेऊन मोठी जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. काही चुकले तर लोक बँकेकडे व माझ्याकडेच बोट दाखविणार आहेत. या सर्व गोष्टीची कल्पना असली तरी, चांगल्या भावनेने ही जबाबदारी घेतली आहे. मी राजारामबापू पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता असताना, वसंतदादा कारखाना कामगारांच्या कार्यक्रमाला मला बोलाविण्यात आले आहे. यामागचे गणित मला कळाले आहे. कामगार आणि शेतकऱ्यांची देणी, कारखाना चालला तरच मिळणार आहेत. कारखाना भाडेतत्त्वावर दिला असल्याने देणी मिळणार, याची खात्री सर्वांनी बाळगावी.
थकीत देण्यांबाबत जिल्हा बँक कामगार व शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. चर्चेतून देण्यांबाबत मार्ग काढण्यात येईल. कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी सर्वच संचालक मंडळाने स्वीकारली आहे. यामध्ये खासदार संजयकाका पाटील यांचाही समावेश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, कामगारांच्या व्यथा काय असतात, याची मला जाणीव आहे. बँक म्हणून कोणाचेही नुकसान होऊ न देण्याची आमची जबाबदारी आहे. चांगल्या लोकांच्या हाती कारखाना देण्यात येणार असल्याने देणी निश्चितपणे मिळतील. हा कारखाना पुन्हा नावारुपास आणण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेते कामाला लागलो आहोत.
वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील म्हणाले की, आर. बी. शिंदे यांनी वसंतदादा कारखान्याप्रती निष्ठा राखताना कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या काळातच कामगार एक होते. आता थोडा विस्कळीत झाल्यासारखा वाटत आहे. त्यांची देणी मिळणार असल्याने कामगारांनी एकत्रच राहावे, असे आवाहन त्यांनी केले. अॅड. के. डी. शिंदे यांनी, कामगार, शेतकरी, सभासदांची देणी कायदेशीर असल्याने कोणीही बुडवू शकत नसल्याचे स्पष्ट केले.
स्वागत व प्रास्ताविक कामगार नेते प्रदीप शिंदे यांनी केले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, बजरंग पाटील, तात्यासाहेब काळे, श्रीपती पाटील, शंकरराव भोसले आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)
विशाल पाटील यांचे राजकारण
कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात देऊन विशाल पाटील मोकळे झाले आहेत. ते मोकळे झाले की आमच्या मागे लागणार आहेत. कारखान्यावर येणारी जबाबदारी बँकेवर ढकलून त्यांनी राजकीय खेळी खेळली आहे. ते आमचे पाहुणे असले तरी, राजकारणात दोघांचे विचार वेगळे आहेत, असे दिलीपतात्या पाटील यांनी स्पष्ट केले.
तुम्ही काँग्रेसमध्येच आहात का?
वसंतदादा कारखान्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचे सांगत असताना संजयकाकांनी मध्येच विशाल पाटील यांना सवाल केला, ‘तुम्ही अजून काँग्रेसमध्येच आहात का?’ यावर उपस्थितांत हशा पिकला.
शिंदे यांना आदरांजली
यावेळी उपस्थित राजकीय नेते, कामगार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार यांनी आर. बी. शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
कारखाना केव्हाही विकू शकतो...
वसंतदादा कारखाना कायदेशीररित्या जिल्हा बँकेकडे तारण आहे. हा कारखाना जिल्हा बँक केव्हाही विकू शकते. तरीही आम्ही तसा निर्णय घेतला नाही. सूडबुद्धीनेच वागायचे असते, तर कारखाना विकून मोकळे झालो असतो. आम्हाला खऱ्याअर्थाने कारखाना वाचवायचा आहे, असेही दिलीपतात्या यांनी स्पष्ट केले.