जयंतरावांचे राजकीय वारसदार प्रतीकच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:19 PM2018-05-13T23:19:18+5:302018-05-13T23:19:18+5:30
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : बापूंच्या निधनाने वाळवा तालुका पोरका झाला आणि राजकीय वारशाचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी थोरले असल्याने भगत पाटील यांच्यावर घराची जबाबदारी आली आणि दुसरे चिरंजीव जयंत पाटील यांच्याकडे अनपेक्षितपणे राजकीय वारसपद आले. यावेळी उलट परिस्थिती आहे थोरल्याचा मान म्हणून स्वत: जयंत पाटील यांनी प्रतीक पाटील यांनाच राजकीय वारस म्हणून अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे. आगामी विधानसभेला आ. पाटील यांच्या प्रचाराची धुरा तेच सांभाळणार आहेत.
१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत राजारामबापू पाटील यांच्या प्रचाराची यंत्रणा ज्येष्ठ नेत्यांकडे होती. त्यावेळी थोरले चिरंजीव भगत पाटील यांची प्रचाराच्या माध्यमातून तात्पुरती राजकीय एन्ट्री झाली होती. त्यावेळी भगत पाटील हेच राजारामबापूंचे राजकीय वारसदार म्हणून गणले जाऊ लागले. परंतु राजारामबापू पाटील यांच्या अचानक निधनाने त्यांच्या पत्नी कुसूमताई व थोरले चिरंजीव भगत यांच्यावर घराची जबाबदारी आली. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून जयंत पाटील यांना वाळवा साखर कारखान्याची जबाबदारी स्वीकारावी लागली. याला तालुक्यातील काही नेत्यांनी अंतर्गत विरोध केला होता. परंतु कोणाचीही डाळ शिजली नाही. तेथून पुढे जयंत पाटील यांनी आपला राजकीय आलेख कायम चढताच ठेवला.
जयंतरावांनी राजकारणात चढ- उतार पाहिले. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत मतदार संघ आणि राजारामबापू उद्योग समूहातील निर्णय घेणारे नेतृत्व आजही तयार झालेले नाही. राष्ट्रवादीने पूर्ण राज्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर सोपविल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वत:च्या मतदार संघाबरोबरच पूर्ण महाराष्ट्रात फिरावे लागणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीत इस्लामपूर मतदार संघातील प्रचाराची सर्व धुरा प्रतीक पाटील सांभाळणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे प्रतीक पाटील यांनी मतदार संघात सक्रिय होऊन आपला संपर्क वाढवला आहे.
निष्ठावंतांना न्याय देण्याची भूमिका
१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत राजारामबापू पाटील यांच्याच कार्यकर्त्यांनी गद्दारी केली. तुम्हीच निवडून येणार, असे म्हणत बापूंना अंधारात ठेवले. त्यामुळे निवडणुकीत घात झाला. अशाच पध्दतीने आमदार जयंत पाटील यांनाही अनुभव आला आहे. सत्ता गेल्यानंतर अनेकांनी भाजप गाठली. आता पुन्हा प्रदेशाध्यक्षपद आल्यानंतर तेच पुन्हा राष्ट्रवादीकडे वळू लागले आहेत. बापू आणि जयंत पाटील यांचा अनुभव पाहता, प्रतीक पाटील यांनीही कार्यकर्त्यांना जवळ करताना खऱ्या निष्ठावंतांना न्याय द्यावा.