जयंतरावांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा

By admin | Published: June 21, 2016 12:12 AM2016-06-21T00:12:21+5:302016-06-21T01:22:36+5:30

पृथ्वीराज पवार : जिल्ह्यात चारशे कोटींचा गैरकारभार; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार

Jayantrao's resignation of MLA | जयंतरावांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा

जयंतरावांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा

Next

सांगली : आॅनलाईन लॉटरी घोटाळ्या-प्रमाणेच सत्तेचा गैरवापर करून राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी जिल्ह्यातही चारशे कोटींचा गैरकारभार केला आहे. या साऱ्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. ‘मिस्टर क्लिन’ अशी प्रतिमा असलेल्या जयंत पाटील यांनी आमदारकी व विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिले.
पवार म्हणाले की, आॅनलाईन लॉटरी घोटाळ्यात सनदी अधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. पाटील यांनी जिल्ह्यातही चारशे कोटींचा गैरकारभार केला आहे. वित्तमंत्री या नात्याने ते साखर कारखाने भाड्याने देणे, विकणे या समितीवर सदस्य होते. तेव्हा जत साखर कारखाना राजारामबापू कारखान्याला ५० ते ५२ कोटीत विकला गेला. वास्तविक जत कारखान्याची यंत्रसामग्री, जमीन अशी मालमत्ता शंभर कोटींच्या पुढे आहे. आजारी साखर कारखाना पहिल्यांदा भाड्याने द्यायचा नियम आहे. हा कारखाना राजारामबापू कारखान्यानेच भाड्याने घेतला. त्यानंतर विक्री प्रक्रियेतही केवळ याच एकमेव कारखान्याची निविदा आली. यात खरे गौडबंगाल आहे.
केंद्र शासनाने एफआरपीपोटी साखर कारखान्यांना मदत केली होती. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश होते. राजारामबापू कारखान्याच्या सर्व युनिटची एफआरपी २५०० ते २६०० रुपये होते. या कारखान्याने २६०० रुपयांतून शेतकऱ्यांची ३० ते ३५ कोटींची रक्कम कपात केली आहे. सभासदांच्या सहमतीशिवाय जिल्हा बँकेने ही कपात केली. त्याबद्दल व्यवस्थापकीय संचालकांना पदभार सोडावा लागला होता. केंद्राच्या आदेशाचे कारखान्याने उल्लंघन केले आहे. इस्लामपूर येथे ४० लाख रुपये खर्चून खोकी उभारण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे ई-टेंडर काढले. ज्याने काम केले, त्याला ई-टेंडरमधून काम देण्यात आले. यातूनच त्यांचा ‘पारदर्शी’ कारभार दिसून येतो. २०१३ च्या शेतकरी आंदोलनात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना तोडफोड करण्याचे आदेश दिले होते. त्याची ‘क्लिप’ही जाहीर झाली होती. त्या आंदोलनात हजारो युवकांवर गुन्हे दाखल झाले. २५ ते ३० कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. या प्रकरणाची चौकशी करून चिथावणी देणाऱ्यावर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
या साऱ्या प्रकरणात जयंत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर संशयाची सुई जाते. याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहोत. सांगलीतील भाजप जयंतराव चालवित आहेत. त्यामुळे सांगलीतील भाजपचे नेते काय करतील, हे सांगता येत नाही. पण आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असून, प्रसंगी रस्त्यावरही उतरू. मिस्टर क्लिन जयंत पाटील यांनी आमदारकी व विधिमडंळ गटनेतेपदाचा राजीनामा देऊन नि:पक्षपणे चौकशीला सामोरे जावे, असे आवाहनही दिले. (प्रतिनिधी)


आॅनलाईन लॉटरी : नव्हे, मटकाच
लॉटरी घोटाळ्याबाबत पवार म्हणाले की, केंद्र शासनाने २००१ मध्येच आॅनलाईन लॉटरीबाबत राज्य शासनाला पत्र पाठविले होते. लॉटरीची सोडत, सर्व्हर, सोडतीचे ठिकाण या बाबी राज्यातून हाताळणे अपेक्षित होते. केंद्र शासनाच्या नियमांचे अनेक ठिकाणी उल्लंघन झाले आहे. मध्यंतरी केवळ चार अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. सत्ता व पदाच्या ताकदीवर या घोटाळ्याचा अहवाल दडपण्यात आला. आॅनलाईन लॉटरी नव्हे, हा तर एकप्रकारचा मटकाच आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.

आणखी एक मोठा आर्थिक घोटाळा
जयंत पाटील यांच्याशी संबंधित एका संस्थेने शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. त्याची कागदपत्रेही हाती आली आहेत. आठवडाभरात या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार आहोत. या प्रकरणाची ईडी, सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. सखोल चौकशी झाल्यास खरे सूत्रधार समोर येतील, असा गौप्यस्फोटही पवार यांनी यावेळी केला.

Web Title: Jayantrao's resignation of MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.