जयंतरावांच्या पुत्रांची राजकीय मशागत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:10 AM2018-04-30T00:10:45+5:302018-04-30T00:10:45+5:30

Jayantrao's son's political workshop ... | जयंतरावांच्या पुत्रांची राजकीय मशागत...

जयंतरावांच्या पुत्रांची राजकीय मशागत...

Next

अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर मतदार संघात घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे दोन्ही पुत्र प्रतीक आणि राजवर्धन पाटील यांनी राजकीय मशागतीला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार जयंत पाटील यांनी दोघा मुलांना तालुक्यात संपर्कासाठी आणले आहे. त्यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी व राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकाºयांची रेलचेल दिसते.
इस्लामपूर मतदार संघात घराणेशाहीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राजारामबापू पाटील यांच्यापासून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलापर्यंत घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आहे. राजारामबापू यांच्या पश्चात अचानक जयंत पाटील यांना राजकारणात यावे लागले. हीच परंपरा पुढे आली असून जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक आणि राजवर्धन यांनीही गेल्या वर्षभरात इस्लामपूर मतदार संघात राजारामबापू उद्योग समूहात लक्ष केंद्रित केले आहे. या दोघांच्याही प्रसिध्दीसाठी राष्ट्रवादी व उद्योग समूहातील पदाधिकाºयांत चांगलीच रेलचेल सुरू आहे.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचाही राजकीय वारसा त्यांचे पुत्र अ‍ॅड. चिमण व विश्वास डांगे यांनी जोपासला आहे. चिमण डांगे यांनी नगरसेवक, नगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचे बंधूही पालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. माजी आमदार विलासराव शिंदे यांनीही राष्ट्रवादीची धुरा सक्षमपणे पेलली आहे. त्यांचेही पुत्र वैभव शिंदे आणि विशाल शिंदे हे राजकीय पटलावर कार्यरत आहेत. वैभव शिंदे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
इस्लामपूर मतदार संघात वाळव्याच्या हुतात्मा संकुलाचे राजकारण चांगलेच चर्चेत असते. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पश्चात त्यांचे पुत्र वैभव नायकवडी, स्नुषा सुषमा नायकवडी, नातू गौरव नायकवडी आपापल्यापरीने राजकारणात स्थिरावले आहेत. परंतु त्यांनी अद्याप कोणत्याही पक्षाला जवळ केलेले नाही. तेथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांचेही पुत्र संग्राम पाटील यांची नुकतीच वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर निवड झाली आहे.
अशीच परिस्थिती पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांची आहे. त्यांचे दोन्ही पुत्र राजकारणात सक्रिय आहेत. दोघांनीही सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. राहुल इस्लामपूर, तर सम्राट शिराळा मतदार संघातून चाचपणी करत आहेत. शेतकरी चळवळीतील उदयास आलेल्या सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाले आणि त्यांचा मुलगा सागर खोत यांच्या राजकीय घरणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
एकूणच वाळवा तालुक्यात मातब्बर नेत्यांच्या वारसदारांचीच चलती आहे. आता प्रतीक व राजवर्धन तालुक्यात सक्रिय झाल्यामुळे जयंत पाटील यांना आणखी बळ मिळणार आहे.
कार्यकर्त्यांचे प्रेम...
प्रतीक व राजवर्धन यांच्याकडे अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस अथवा राजारामबापू समूहातील कोणतीही जबाबदारी नसली तरी, तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून जयंत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना यापूर्वीच स्वीकारले आहे. मतदार संघात विविध ठिकाणच्या दौºयावेळी जयंत पाटील यांना मानणारे कार्यकर्ते दोघांवरही प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Web Title: Jayantrao's son's political workshop ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.