शेट्टींच्या भूमिकेने जयंतराव ‘टेन्शन’मुक्त : सदाभाऊ खोत यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:32 AM2018-04-04T00:32:11+5:302018-04-04T00:32:11+5:30

Jayantrao's 'Tension' free from Shetty's stand: Sadabhau Khot's dilemma | शेट्टींच्या भूमिकेने जयंतराव ‘टेन्शन’मुक्त : सदाभाऊ खोत यांच्या अडचणीत वाढ

शेट्टींच्या भूमिकेने जयंतराव ‘टेन्शन’मुक्त : सदाभाऊ खोत यांच्या अडचणीत वाढ

Next
ठळक मुद्देउमेदवार निवडीसाठी कसरत ; ‘स्वाभिमानी’ आता आघाडीसोबतगत विधानसभा निवडणुकीवेळी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात सक्षम नेतृत्व नव्हते

अशोक पाटील।
इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आव्हान होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यास कोणीही इच्छुक नव्हते. परंतु यावेळी मात्र चित्र उलटे असून, खासदार शेट्टी आणि काँग्रेस आघाडी एकत्र येणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील टेन्शनमुक्त झाले आहेत, तर भाजपच्या गोटात जाऊन बसलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. आता त्यांना उमेदवार निवडीसाठी कसरत करावी लागणार आहे.

खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक यांनी बांधलेल्या विकास आघाडीची बिघाडी झाली आहे; तर दुसरीकडे बिघडलेली काँग्रेसची घडी बसवण्याचा प्रयत्न खासदार शेट्टी यांच्यामुळे होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस आघाडीतर्फे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधात शेट्टी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे; तर भाजपपुढे सध्या कोणताही चेहरा नसला तरी, अंतिम टप्प्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याच गळ्यात उमेदवारी मारली जाण्याची शक्यता आहे.

खासदार शेट्टी आता काँग्रेस आघाडीसोबत आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका दोन्ही कॉँग्रेस एकत्रित लढवणार असल्याचे भाकित राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे वाळवा-शिराळ्यातील राजकारण उलट्या दिशेने वाहू लागले आहे. इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादी विरोधात युवा नेतृत्व तयार करण्यासाठी खोत यांनी कंबर कसली आहे. शिराळ्यातही आमदार शिवाजीराव नाईक यांना ताकद देण्यासाठी खोत सरसावले आहेत. परंतु भाजपने दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन अद्यापही पूर्ण न झाल्याने आमदार नाईक यांचे कार्यकर्ते आगामी विधानसभेला काय भूमिका घेणार, हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

गत विधानसभा निवडणुकीवेळी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात सक्षम नेतृत्व नव्हते. यावेळी भाजपने पाटील यांना खिंडीत पकडण्याचा डाव आखला आहे. बंदूक चालवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी, खांदा मात्र खोत यांचा आहे. खोत यांनी गेल्या वर्षभरापासून उमेदवार शोधमोहीम सुरू ठेवली होती. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना पहिली पसंती दिली आहे. यानंतर आष्ट्याचे वैभव शिंदे, महाडिक गटाचे राहुल महाडिक, विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे.

लोकसभा निवडणूक : रंगतदार होणार
राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोघेही शेतकरी चळवळीतील नेते आहेत. हे दोघे एकत्रित होते त्यावेळी त्यांच्यापुढे इतर पक्षांचा टिकाव लागत नव्हता. दस्तुरखुद्द जयंतरावांनाही त्यांच्यापुढे नमते घ्यावे लागले होते. परंतु आता हे दोघे विरोधात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून आघाडीतर्फे खा. शेट्टी आणि भाजपतर्फे खोत यांचीच लढत निश्चित मानली जात आहे.

Web Title: Jayantrao's 'Tension' free from Shetty's stand: Sadabhau Khot's dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.