जयंतरावांचा रस सूडबुद्धीच्या खेळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:40 AM2018-03-26T00:40:09+5:302018-03-26T00:40:09+5:30

कासेगाव : सर्वोदय साखर कारखाना उभा करण्यासाठी संभाजी पवारांनी रक्ताचे पाणी केले. वसंतदादांशी संघर्ष करून राजारामबापूंसाठी छातीचा कोट केला. बापूंच्या निधनानंतर जयंत पाटलांना खांद्यावर घेऊन ते सांगलीला नाचत गेले. संभाजी पवारांना कळले नसावे, की हे भुताचे पाय आहेत. पायात पाय अडकवल्यानंतर आता त्यांना कळून चुकले आहे. जयंत पाटलांनी नेहमीच सूडबुद्धीने राजकारण करून आपला स्वार्थ साधण्यात रस घेतला, असा घणाघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.

Jayantravancha juice in sudh buddhi play | जयंतरावांचा रस सूडबुद्धीच्या खेळात

जयंतरावांचा रस सूडबुद्धीच्या खेळात

Next
ठळक मुद्देसदाभाऊ खोत : कासेगाव येथील कार्यक्रमात टीका

कासेगाव : सर्वोदय साखर कारखाना उभा करण्यासाठी संभाजी पवारांनी रक्ताचे पाणी केले. वसंतदादांशी संघर्ष करून राजारामबापूंसाठी छातीचा कोट केला. बापूंच्या निधनानंतर जयंत पाटलांना खांद्यावर घेऊन ते सांगलीला नाचत गेले. संभाजी पवारांना कळले नसावे, की हे भुताचे पाय आहेत. पायात पाय अडकवल्यानंतर आता त्यांना कळून चुकले आहे. जयंत पाटलांनी नेहमीच सूडबुद्धीने राजकारण करून आपला स्वार्थ साधण्यात रस घेतला, असा घणाघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.
कासेगाव (ता. वाळवा) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. शिवाजीराव नाईक, विक्रम पाटील, प्रसाद पाटील, बापूसाहेब शिंदे, नेताजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. नाईक यांचा स्थानिक विकास निधी व इतर माध्यमातून कासेगावमध्ये मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
सर्वोदय कारखान्याबाबतीत पृथ्वीराज पवार यांना झालेल्या शिक्षेचा धागा पकडत खोत म्हणाले की, कारखाना हडप करून आज त्यांच्याच मुलावर हे लोक दावा ठोकतात. निदान राजारामबापूंना त्यांनी केलेल्या मदतीची तरी जाण ठेवायची होती. जिल्ह्यात व वाळवा तालुक्यात त्यांनी नेहमीच सूडबुद्धीचे राजकारण केले. नेर्ले येथे नऊ कोटी रुपये मंजूर करून नवी पाणीपुरवठा योजना आणली. मात्र त्यांच्याच सांगण्यावरून यालाही विरोध केला. वाघवाडी येथील सत्तर एकर जागा हडप करण्याचा डाव उधळून याठिकाणी कृषी विद्यालय मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले.
इस्लामपूरची सत्ता गेल्या ३१ वर्षांपासून तुमच्याकडे होती. या काळात जेवढा निधी तुम्ही आणला, तेवढा निधी आम्ही गेल्या सव्वा वर्षात आणला. राजकीय द्वेषापोटी माझ्या गावावर काही मंडळी चौकशी लावत आहेत. मी आधीच फाटका आहे. फाटक्याचं काय फाटत नाही, पण धडक्याचं फार फाटतं हे लक्षात ठेवा, असे त्यांनी सांगितले.
आ. शिवाजीराव नाईक म्हणाले की, कासेगावने मला नेहमीच मदत केली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही सर्व विकासकामे पूर्ण झाली असून अजूनही भरपूर कामे करायची आहेत. वाळवा तालुक्यातील या अठ्ठेचाळीस गावांत एकोणीस कोटींची कामे केली आहेत. प्रसाद पाटील, संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नूतन ग्रा. पं. सदस्यांचा व सर्व ग्रामपंचायत उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास संजय पाटील, दिनकर जाधव, पांडुरंग वाघमोडे, ज्ञानदेव पाटील, राजेंद्र पाटील, विनोद कांबळे, राजाराम पाटसुते, शहाजी मिसाळ उपस्थित होते.
महाडिकांना : टोला
आमदार शिवाजीराव नाईक यांनी या मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून तेच पुन्हा एकदा असणार आहेत. त्यामुळे कोणी कितीही जोर-बैठका काढायला सुरुवात केली तरी, त्याचा काही उपयोग होणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला मंत्री खोत यांनी सम्राट महाडिक यांचे नाव न घेता मारला.

Web Title: Jayantravancha juice in sudh buddhi play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.