‘लोकमत’चे जतचे वार्ताहर जयवंत आदाटे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:21+5:302021-05-24T04:26:21+5:30
संख : ‘लोकमत’चे जत येथील वार्ताहर जयवंत विठोबा आदाटे (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते तालुक्यात ‘पत्रकार ...
संख : ‘लोकमत’चे जत येथील वार्ताहर जयवंत विठोबा आदाटे (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते तालुक्यात ‘पत्रकार आदाटे काका’ नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉ. जोत्स्ना आदाटे, मुलगा पत्रकार जॉकेश आदाटे, दोन भाऊ, तीन विवाहित बहिणी, भावजई, पुतण्या असा परिवार आहे.
आदाटे यांचा ‘लोकमत’शी २२ वर्षांचा ऋणानुबंध होता. शांत मनमिळाऊ, संयमी व्यक्तिमत्त्वाचे आदाटे जत तालुक्यातील ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार होते. सामाजिक, राजकीय, शेती या विविध विषयांवर त्यांनी चौफेर लेखन केले. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी विविध दैनिकांत पत्रकारिता केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटनेचे ते सक्रिय सदस्य होते. जत तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे उपाध्यक्षपद त्यांनी सांभाळले होते. जतमध्ये त्यांचे पादत्राणांचे आणि स्वस्त धान्याचे दुकान आहे.
पंचवीस दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात त्यांंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. कोरोनाच्या संसर्गातून ते बरे झाले होते. परंतु फुप्फुसाचा संसर्ग वाढल्याने परत तब्येत बिघडल्याने रविवारी दुपारी निधन झाले. त्यांच्यावर जत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविर्सजन मंगळवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.