Sangli: शिवपुरी येथे वाकुर्डे योजनेची जलवाहिनी जेसीबीने फोडली, हजारो लिटर पाणी वाया
By संतोष भिसे | Published: February 29, 2024 03:20 PM2024-02-29T15:20:46+5:302024-02-29T15:21:37+5:30
अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
शिराळा : शिवपुरी (ता. वाळवा) येथील परदेशी मळ्यात बुधवारी सकाळी वाकुर्डे योजनेची जलवाहिनी अज्ञात व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने फोडली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली पाटबंधारे विभागाने सुरू केल्या आहेत.
दरम्यान, पाडळीवाडी (ता. शिराळा) येथील तीन शेतकऱ्यांनी व्हॉल्व्ह खोलून पाणी चोरल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाटबंधारेने शिराळा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. शेतीसाठी वाकुर्डे योजनेतून पाणी सोडल्याने प्रश्न मार्गी लागला आहे. यादरम्यान, बुधवारी शिवपुरी येथे योजनेची बंदिस्त जलवाहिनी अज्ञाताने फोडली. योजनेतून उपसा सुरु केल्यानंतर शेतकरी दिवसा व रात्री विनापरवाना व्हॉल्व्ह सुरु करून पाणी तलावा घेत आहेत. याबाबत माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले होते. त्यावेळी नाईक यांनी संबंधित शेतकऱ्यांना व्हॉल्व्ह सुरु करु नये असे आवाहन केले होते.
तरीही पुन्हा व्हॉल्व सुरु करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पाणीचोरीचा बंदोबस्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पोलिस ठाण्यात अर्ज दिला. शिवपुरी येथे वाकुर्डे योजनेचे पाणी पोहचले. त्यावेळी तेथील सिद्धेश्वर तलाव भरण्यासाठी शिवपुरीच्या ६० ते ७० लोकांनी रात्री व्हॉल्व सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिबंधासाठी शिराळा व वाळवा तालुक्यात पाटबंधारे व पोलिसांनी गस्त घातली. निगडी येथे रात्री व्हॅाल्व सुरु केल्याचे आढळले, तो बंद केला. यादरम्यान, शिवपुरीच्या सिद्धेश्वर तलावात पाणी सुरु असताना परदेशी मळा येथे पाईपलाईन फोडण्यात आली.
पोलिसांत तक्रार
पाडळीवाडी (ता. शिराळा) येथेही तिघांनी विनापरवाना व्हॉल्व उघडून पाणी चोरी केली. या तिघांवर कारवाई करावी असा अर्ज उपविभागीय अभियंता प्रकाश बंडगर यांनी पोलिसांत दिला आहे.