जेसीबी चोरणाऱ्या टोळीस सांगलीत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2016 12:07 AM2016-07-02T00:07:24+5:302016-07-02T00:08:17+5:30
सहा जेसीबी जप्त : पुणे, सातारा, अहमदनगर, लातूर, धुळे जिल्ह्यांत विक्री
सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव व कवठेमहांकाळ येथून जेसीबी चोरणाऱ्या टोळीचा गुंडांविरोधी पथकाने शुक्रवारी पर्दाफाश केला. टोळीच्या मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
चोरलेल्या जेसीबींची त्यांनी पुणे, सातारा, अहमदनगर, लातूर व धुळे जिल्ह्यांत विक्री केली होती. पथकाने या पाचही शहरात छापे टाकून सहा जेसीबी जप्त केले आहेत. त्यांची किंमत एक कोटी नऊ लाख रुपये आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दिली.
अटक केलेल्यांमध्ये मोहन वसंत बाबर (वय ४१, रा. लोकरेवाडी, ता. कवठेमहांकाळ), पतंगराव केशव दुपटे (४३, रा. पूर्वा आर्केड, फ्लॅट क्रमांक १०, गोकुळनगर, धानोली, पुणे), बापूराव शंकर वाघमोडे (२९, देऊळगावसिद्धी, जि. अहमदनगर, सध्या फिनोलेक्स कॉलनी, पिंपरी पुणे) यांचा समावेश आहे. संशयितांनी कवठेमहांकाळ व तासगाव येथील जेसीबी मालकांना गाठून, जेसीबी भाड्याने पाहिजे, असे सांगितले. त्यानुसार मालकांनी भाडेकरार करून त्यांच्या ताब्यात सहा जेसीबी दिले होते. करार संपल्यानंतर संशयितांनी जेसीबी परत आणून दिलेच नाहीत. उलट ते अचानक गायब झाले. त्यामुळे जेसीबी मालकांनी कवठेमहांकाळ व तासगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तीन महिन्यांपूर्वी या घटना घडल्या होत्या. स्थानिक पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सुगावा लागला नव्हता.
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी गुंडाविरोधी पथकास या जेसीबींच्या गुन्ह्याचा छडा लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्याकडून याचा गेल्या पंधरवड्यापासून तपास सुरू होता.
संशयित मोहन बाबर हा पुण्यात राहायला असल्याचे समजताच प्रथम त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये हे जेसीबी त्याने पुणे, सातारा, अहमदनगर, लातूर व धुळे जिल्ह्यात विक्री केल्याची कबुली दिली. त्याच्या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. तिघांना सोबत घेऊन पथकाने या पाच जिल्ह्यांत छापे टाकले. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे एक जेसीबी विकला होता. ज्यांनी जेसीबी विकत घेतले होते, त्यांच्याकडून ते जप्त केले आहेत. त्यांना या गुन्ह्यात साक्षीदार करण्यात आले असल्याचे पोलिसप्रमुख शिंदे यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार सुनील भिसे, श्रीपती देशपांडे, महेश आवळे, शंकर पाटील, योगेश खराडे, प्रफुल्ल सुर्वे, सागर लवटे, परशुराम महाजन, पोलिस मुख्यालयाकडील विकास कांबळे, सोहेल काथीयानी, दिग्विजय साळुंखे, संतोष माळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांना तपासात अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक बाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)
दोन पथके तैनात : जेसीबी चोरीचा तपास बाहेरील जिल्ह्यात गेल्याने तपासासाठी निरीक्षक घनवट यांनी दोन पथके तयार केली होती. अहमदनगर, लातूर, धुळे, पाटण (जि. सातारा) येथून प्रत्येकी एक व पुण्यातून दोन असे एकूण सहा जेसीबी जप्त केले आहेत. नांदेड, अमरावती, अकोला, नंदुरबार, करमाळा (जि. सोलापूर) येथेही संशयितांंनी जेसीबी विक्री केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे, असे पोलिसप्रमुख शिंदे यांनी सांगितले. याचा तपास अजूनही सुरू आहे. आणखी कोठून जेसीबी चोरीला गेले आहेत का, याचा उलगडा करण्याचे आदेश दिले आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.
आवळे यांचे कौतुक : जेसीबी चोरणाऱ्या टोळीची माहिती सर्वांत प्रथम गुंडाविरोधी पथकातील हवालदार महेश आवळे यांना मिळाली होती. त्यांच्या माहितीमुळे या टोळीचा पर्दाफाश झाला. तसेच चोरीच्या प्रलंबित सहा गुन्ह्यांचा छडाही लागला.
त्यामुळे पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी आवळे यांचे कौतुक केले.