सुरक्षिततेसाठी फ्रीजमध्ये दागिने लपवले, परंतु चोरट्यांनी ते देखील लांबवले; सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:34 IST2024-12-16T13:33:51+5:302024-12-16T13:34:22+5:30

पोलिसही आश्चर्यचकित

Jewelry was hidden in the fridge for safety but thieves took it away too incident in Sangli | सुरक्षिततेसाठी फ्रीजमध्ये दागिने लपवले, परंतु चोरट्यांनी ते देखील लांबवले; सांगलीतील घटना

सुरक्षिततेसाठी फ्रीजमध्ये दागिने लपवले, परंतु चोरट्यांनी ते देखील लांबवले; सांगलीतील घटना

सांगली : बंद फ्लॅट फोडल्यानंतर चोरट्यांच्या हाती दागिने लागू नयेत म्हणून चक्क फ्रीजमध्ये एका पिशवीत ठेवले होते. परंतु चोरट्यांनी फ्लॅट फोडून सर्वत्र शोध घेत फ्रीजमध्ये पिशवीत ठेवलेले सव्वा तीन लाखांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फ्लॅट मालकासह पोलिसांना देखील आश्चर्यचकित होण्याची वेळ आली.

फिर्यादी संजय दत्तात्रय सेवेकर (वय ५८) हे विश्रामबाग परिसरातील विजयनगर येथे आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये सहकुटुंब राहतात. काही कामानिमित्त दि. २९ नोव्हेंबर रोजी सर्वजण सकाळी ९ वाजता मूळ गावी खोखडपुरा (जि. छत्रपती संभाजीनगर) गेले होते. फ्लॅट बंद करून जाताना प्रवासात कोठे दागिने न्यायचे म्हणून त्यांनी सुरक्षितपणे फ्रीजमध्ये पिशवीत ठेवले होते. सोळा दिवस त्यांचा फ्लॅट बंद होता.

दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये सर्वत्र झडती घेतली. त्यानंतर त्यांचे लक्ष फ्रीजकडे गेले. फ्रीजमध्ये निळ्या रंगाच्या पिशवीतील दागिने त्यांच्या हाती लागले. पिशवीत सोन्याचे मंगळसूत्र, झुब्याचा जोड, दोन सोन्याच्या वाट्या, सोन्याचे २५ मणी, दोन जोड चांदीचे पैंजण होते. सुमारे सव्वा तीन लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्याने पलायन केले. दि. १२ रोजी मध्यरात्रीनंतर एक वाजता सेवेकर कुटुंब फ्लॅटमध्ये परतले. तेव्हा त्यांना फ्लॅट फोडल्याचे दिसले. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सेवेकर यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसही आश्चर्यचकित

चोरटे फार हुशार झाल्यामुळे त्यांच्या हाती दागिने लागणार नाहीत म्हणून सेवेकर यांनी फ्रीजमध्ये दागिने ठेवले होते. परंतु चोरट्यांनी फ्रीजमध्ये शोधाशोध करताना दागिने हाती लागले. सेवेकर यांच्यासह पोलिसही या घटनेने आश्चर्यचकित झाले.

Web Title: Jewelry was hidden in the fridge for safety but thieves took it away too incident in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.