विटा, आटपाडीत चोऱ्या करणाऱ्या सराईताकडून सात लाखांचे दागिने जप्त
By शरद जाधव | Published: January 4, 2024 07:45 PM2024-01-04T19:45:38+5:302024-01-04T19:45:56+5:30
एलसीबीची कारवाई
सांगली : विटा आणि आटपाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करत सोने-चांदीचे ऐवज लंपास करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आण्णा दौलुशा पवार (वय १९, रा. सोमेश्वरनगर, आटपाडी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सहा लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील वाढत्या घरफोडी, चोरीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पथक सांगली शहरात गस्तीवर होते. यावेळी त्यांना माहिती मिळाली की, संशयित पवार हा दागिने विक्रीच्या तयारीत आहे. त्यानुसार शहरातील शिवाजी क्रीडांगणाच्या प्रवेशव्दाराजवळ सापळा लावून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील चौकशीत आटपाडी आणि विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने घरफोडी करून दागिने चोरल्याची कबुली दिली.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, अमोल लोहार, संकेत मगदूम, बाबासाहेब माने, सुनिल जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.