जिगरबाज इमताजभाभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:50 PM2018-10-12T23:50:49+5:302018-10-12T23:53:36+5:30

ग्रामीण महिलाही सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे, विटा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या रेणावी (ता. खानापूर) गावातील जिगरबाज इमताज अजमुद्दीन शिकलगार. ‘भाभी’ नावाने त्या ओळखल्या जातात.

 Jigber Imtazbhai | जिगरबाज इमताजभाभी

जिगरबाज इमताजभाभी

Next

ग्रामीण महिलाही सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे, विटा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या रेणावी (ता. खानापूर) गावातील जिगरबाज इमताज अजमुद्दीन शिकलगार. ‘भाभी’ नावाने त्या ओळखल्या जातात.

दुष्काळाचा सामना करीत कुटुंब सांभाळण्यासाठी ३६ वर्षे वयाच्या इमताज भाभींनी गेल्या दहा वर्षापासून हातात टॉमी, जॅक व हवा भरण्याची पाईप घेऊन चारचाकी, दुचाकी, ट्रॅक्टर आदींसह सर्व प्रकारच्या वाहनांचे पंक्चर काढण्याचे धनुष्य हातात घेतले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या फॅब्रिकेशनच्या कामातही त्या वेल्डींग करण्याचे यंत्र हातात घेऊन पती अजमुद्दीन यांना मदत करत आहेत. महिला असूनही पुरूषांची मक्तेदारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यवसायात त्यांच्या बरोबरीने राबणाºया इमताज भाभींच्या संसाराची चाके पंक्चर काढल्यानंतर मिळणाºया पैशातून आजही फिरत आहेत. तीर्थक्षेत्र श्री रेवणसिध्द देवाच्या भूमीतील या नवदुर्गेची ही जिद्द, चिकाटी आणि हिंमत आजच्या समाजासमोर एक नवा आदर्शच म्हणावा लागेल.

रेणावी हे कºहाड ते विजापूर महामार्गावरील छोटेसे गाव. महामार्ग असला तरी आजुबाजूचा परिसर तसा दुर्गमच. या परिसरात एखादे वाहन पंक्चर झाले, तर विटा किंवा खानापूरशिवाय पंक्चर काढण्याची सोय कोठेच नव्हती. परिणामी, वाहनधारकांची मोठी गैरसोय व हाल हे नेहमीचेच ठरलेले. याचा विशेष फटका बसे तो रेणावीला रेवणसिध्द मंदिरात दर्शनासाठी येणाºया भक्तगणांना. पण आज रेणावीच्या इमताज भाभींनी वाहनधारकांची ही गैरसोय दूर केली आहे. त्यांनी प्रारंभी पती अजमुद्दीन यांना व्यवसायात मदत म्हणून दुचाकी वाहनांचे पंक्चर काढण्याचे काम हाती घेतले. त्यावेळी त्यांना फारसे यश आले नाही.

प्रसंगी आर्थिक नुकसानही झाले, परंतु त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. दोन-चार ट्यूब खराब झाल्या, तरी त्यांनी हार मानली नाही. या कामात त्यांना सरावाने हळूहळू यश मिळू लागले. आपण हा व्यवसाय पूर्ण क्षमतेने करू शकतो, याची खात्री झाल्यानंतर भाभींनी गावातीलच जुमा मस्जिद बचत गटाचे २० हजार रूपये कर्ज घेतले. या रकमेतून त्यांनी पंक्चर काढण्यासाठी लागणारे हवा मारण्याचे यंत्र व अन्य साहित्य खरेदी केले. आता या भाभी दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर आदींसह अन्य कसल्याही मोठ्या वाहनांचे पंक्चर काढण्याचे काम सहजपणे करीत आहेत. या कामातून वेळ काढून भाभी त्यांचा पारंपरिक असलेला फॅब्रिकेशनचा व्यवसायही सांभाळतात. लोखंडाला वेल्डींग करण्याचा गण हातात घेऊन त्या वेल्डींगही करतात. सुरूवातीला थोडी धास्ती होती, पण पतीच्या सहकार्यामुळेच आपण या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो, असे भाभी आवर्जून सांगतात.

अवघ्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या इमताज भाभी पुरूषप्रधान संस्कृतीला लाजवेल, असे काम करीत आहेत. जुमा मस्जिद बचत गटाकडून घेतलेले २० हजार रूपयांचे कर्ज त्यांनी कधीच फेडले आहे. आता पंक्चर काढून मिळालेल्या पैशातून घरातील संसाराचा गाडा त्या हाकत आहेत. सासू चॉँदबी, सासरे शौकत, पती अजमुद्दीन, मुले इमरान व वाहीद हे त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. मोठा मुलगा इमरान हा आयटीआयचे शिक्षण घेत असून लहान मुलगा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. या दोन मुलांचे शिक्षण व संसाररथ चालविण्याची जबाबदारी इमताज भाभींनी यशस्वीरित्या पेलली आहे.


रेणावी येथे वाहनांचे पंक्चर काढण्याची कोणतीही सोय नव्हती. त्यामुळे रेवणसिध्द देवाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या गाड्या पंक्चर झाल्या, तर त्यांना खानापूर किंवा विटा येथे जाण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरत नव्हता. त्यामुळे पतीच्या फॅब्रिकेशन व्यवसायाला मदत करीत मी पंक्चर काढण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. हे काम स्वीकारले खरे, परंतु सुरूवातीला फारसे काही जमले नाही. त्यानंतर मात्र सरावाने सर्व गोष्टी जमू लागल्या. या क्षेत्रात आपल्याला यश मिळू शकते, हे लक्षात आल्यानंतर बचत गटाचे वीस हजार रूपये कर्ज घेऊन पूर्ण क्षमतेने हा व्यवसाय सुरू केला आहे. आज यातून घरखर्च तर चालतोच, पण त्यापेक्षा वाहनधारकांची सोय होते, याचे समाधान मला मिळते, असे सौ. इमताजभाभी गर्वाने सांगतात.

 

तीर्थक्षेत्र श्री रेवणसिध्द देवाच्या भूमीतील ही दुर्गा केवळ त्यांच्या दुकानातच नव्हे, तर घरकामातही कायम सक्रिय आहे. मुलांचे शिक्षण, पती, सासू, सासरे यांची देखभाल आणि पती अजमुद्दीन यांना फॅब्रिकेशनच्या व्यवसायात हातभार लावणारी नवदुर्गा इमताज भाभी आजच्या पिढीसमोरचा एक नवा आदर्श आहे, असे म्हटले तरी निश्चितच वावगे ठरणार नाही.
                                                                                                                                                                   ’ दिलीप मोहिते, विटा

Web Title:  Jigber Imtazbhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.