एकीसाठी पुढे आल्या जिजाऊंच्या लेकी
By admin | Published: September 23, 2016 11:37 PM2016-09-23T23:37:03+5:302016-09-23T23:37:03+5:30
क्रांती मोर्चाच्या नियोजनात पुरुषांच्या बरोबरीने सहभाग : दोन हजारावर स्वयंसेवक तरुणींची नोंदणी
सांगली : कोपर्डीच्या घटनेनंतर सर्वच स्तरांमधून, विशेषत: स्त्रियांमधून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त होत असून, कोपर्डीचा निषेध, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर जिजाऊंच्या या लेकी मराठा क्रांती मोर्चात ताकद दाखविणार आहेत. मराठा समाजात एकी टिकावी यासाठी सांगलीतील मोर्चाच्या नियोजनातही त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला आहे. घरा-घरातील चुलीपर्यंत पोहोचत, मोर्चात सहभागी होणे किती महत्त्वाचे हे ठसवण्यात महिला यशस्वी ठरल्या आहेत. त्यांनी अक्षरश: पायाला भिंगरी लावून प्रचार यंत्रणा राबविली आहे.
राज्यभर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चांतून कोपर्डी घटनेबद्दलचा तीव्र असंतोष दिसून येत आहे. या मोर्चांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे. मंगळवारी सांगलीत होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर स्त्रीशक्तीचा जागर पदोपदी जाणवत आहे. मोर्चाच्या नियोजनाच्या पहिल्या बैठकीपासूनच महिलांनी सक्रिय सहभाग दाखविला आहे.
मोर्चामध्ये अग्रभागी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणी, महिला असा क्रम असल्याने, मोर्चात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी जोरदार नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात सर्वत्र महिलांच्या बैठका सुरू आहेत. त्यांच्या सहभागासाठी दोन हजाराहून अधिक तरुणींनी स्वयंसेवक म्हणून नाव नोंदविले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून ते राम मंदिर चौकापर्यंत सर्व ठिकाणी ठराविक अंतरावर तरुणींची पथके तैनात असणार आहेत. यात प्रत्येक दहा तरुणींमागे एक प्रमुख असणार आहे. मोर्चाच्या सुरुवातीपासून ते गर्दी कमी होईपर्यंत या तरुणी दिलेल्या ‘स्पॉट’वर थांबतील. या सर्वांना एकच ‘ड्रेस कोड’ आहे. मराठा क्रांती मोर्चाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असणाऱ्या शिस्तबध्दतेला प्राधान्य देण्यासाठी पथक कार्यरत असणार आहे. याबाबत तरुणींना अधिक माहिती देण्यासाठी शनिवार व रविवारी बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)