जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून बदली
By अशोक डोंबाळे | Published: June 7, 2023 08:54 PM2023-06-07T20:54:31+5:302023-06-07T20:54:41+5:30
अंकुर बालशिक्षणातून कणखर व बुद्धिमान युवा निर्मितीचा पायाचा मजबूत होणार आहे.
सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून बुधवारी बदली झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी मॉडेल स्कूल, अंकुर बालशिक्षण, जलजीवन मिशन, स्मार्ट पीएसीच्या माध्यमातून जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे.
सांगली जिल्हा परिषदेचा त्यांनी दि. ११ जुलै २०२० मध्ये पदभार घेतला. पदभार स्वीकारला त्यावेळी कोरोनाचा कहर होता. याचवेळी आरोग्य केंद्रातच कोविड सेंटर सुरू करून रुग्णांचे हाल कमी केले. सांगली जिल्हा परिषद शाळांमध्ये दरवर्षी पाच ते दहा हजारांनी पटसंख्या घटून शंभर शिक्षक अतिरिक्त होऊन जिल्ह्याबाहेर जात; पण डुडी यांनी मॉडेल स्कूलचा उपक्रम हाती घेतला आणि शाळांचा चेहराच बदलला. विद्यार्थ्यांची गळती थांबून वर्षाला चार ते पाच हजारांनी पटसंख्येत भर पडत आहे.
खासगी नामांकित शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले आहेत. ३५० जिल्हा परिषद शाळांमध्ये मॉडेल स्कूल उपक्रम राबिवला आहे. आनंददायी अभ्यासक्रम सध्या राज्यातील सर्व शाळांमध्येही राबविला जात आहे. अंकुर बालशिक्षण उपक्रमाने अंगणवाड्यातील मुलांचा शैक्षणिक पाया सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला.
अंकुर बालशिक्षणातून कणखर व बुद्धिमान युवा निर्मितीचा पायाचा मजबूत होणार आहे. सांगली जिल्हा परिषदेची ही योजनाही सध्या राज्य शासनाने घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्मार्ट पीएसी उपक्रम राबविला जात आहे. सर्व आरोग्य केंद्रांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार भौतिक सुविधा दिल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून ६३६ गावांमध्ये ६८३ योजना मंजूर करून ८२ योजनांची कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित सर्व योजनांची कामे ८० ते ९० टक्के पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांकावर येण्याचा मानही सांगलीला मिळाला आहे. यात सर्वाधिक मोठा वाटा डुडी यांचा आहे.