नागेवाडी गटातून जितेश कदम यांची चर्चा
By Admin | Published: October 6, 2016 11:46 PM2016-10-06T23:46:52+5:302016-10-07T00:04:37+5:30
जिल्हा परिषद निवडणूक : खानापूर काँग्रेसमधून एकमत, राष्ट्रवादी काँग्रेसचीही मूक संमती
दिलीप मोहिते -- विटा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक गट व गणातून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. खानापूर तालुक्यातील नागेवाडी जिल्हा परिषद गटातून कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश (भैया) कदम यांनी कॉँग्रेसमधून निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू झाली असून, खानापूर तालुका कॉँग्रेसनेही जितेश यांच्या नावावर एकमत केल्याचे समजते. राष्ट्रवादीचीही त्यांच्या नावाला संमती असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
नागेवाडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण खुला झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी अपेक्षित आहे. या गटावर शिवसेनेचे विद्यमान आ. अनिल बाबर यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी खानापूर तालुका कॉँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गुरूवारी मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कॉँग्रेसने शिवसेनेला प्रतिस्पर्धी ताकदीचा उमेदवार देण्यासाठी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश कदम यांच्या नावावर एकमत करून त्यांनाच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
डॉ. जितेश कदम यांचे आजोळ खानापूर तालुक्यातील पारे असून, प्रतापराव साळुंखे यांचे ते नातू आहेत. खानापूर तालुक्याच्या विभाजनापूर्वीपासून कदम कुटुंबियांचा या तालुक्यात चांगला संपर्क आहे. उदगिरी शुगरच्या माध्यमातून कदम कुटुंबाने खानापूरचे नाते जास्तच दृढ केले आहे. त्यातच डॉ. जितेश यांचा कडेगावसारखाच खानापूर तालुक्यातही चांगला संपर्क असून, त्यांनी युवा संघटनही मजबूत केले आहे. विटा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यक्रमात डॉ. जितेश यांचा सहभाग आहे.
त्यामुळे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी नागेवाडी जिल्हा परिषद गटातून कॉँग्रेसच्यावतीने डॉ. जितेश कदम यांना उमेदवारी देण्याबाबत तालुक्यातील कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. खानापूर तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष रवींद्रअण्णा देशमुख यांचे माधळमुठी हे गावही नागेवाडी जिल्हा परिषद गटात आहे. त्यामुळे कॉँग्रेसचा असलेला संपर्क आणि युवा संघटन या दुहेरी पटावर डॉ. जितेश यांनीच नागेवाडीतून निवडणूक लढवावी, असा आग्रह कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे.
डॉ. जितेश कदम यांनी नागेवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी केल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे डॉ. कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत. याबाबत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याशी संयुक्तिक चर्चा करण्यात येणार असून, डॉ. जितेश यांनाच उमेदवारी देण्यासाठी मोहनराव कदम यांना आग्रह करण्यात येणार आहे.
येत्या आठवड्यात नागेवाडी जिल्हा परिषद गटातून डॉ. जितेश कदम यांच्या उमेदवारीसाठी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
मोहनराव दादांचा निर्णय अंतिम...
खानापूर तालुक्यातील नागेवाडी जिल्हा परिषद गटातून मी निवडणूक लढवावी, असा कॉँग्रेस कार्यकर्त्यांतून मतप्रवाह येत असला तरी, याबाबतचा अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते मोहनराव कदम घेणार आहेत. त्यांचा निर्णय मला अंतिम राहणार आहे. नागेवाडी जिल्हा परिषद गटातून दादांनी मला हिरवा कंदील दिल्यास मी येथून निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे मत कॉँग्रेसचे युवक नेते डॉ. जितेश कदम यांनी गुरूवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.