नोकरीचे बनावट नेमणूक पत्र
By admin | Published: December 10, 2015 12:01 AM2015-12-10T00:01:46+5:302015-12-10T00:55:43+5:30
एकास अटक : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस लेटरपॅड
जत : सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून व जिल्हाधिकारी यांच्या नावाचे बनावट लेटरपॅड व सही-शिक्का वापरून खोटे नेमणूक पत्र दिल्याच्या आरोपावरून राहुल बंडा टिंगरे (वय ३१, रा. बुधगाव, ता. मिरज) याला जत पोलिसांनी अटक केली. त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.समीर नजीर चट्टरगी (३४) यांना जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर व त्यांची पत्नी रोशन चट्टरगी (३०, रा. दोघे हुजरे गल्ली, जत) यांना टायपिस्टची नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश २८ जानेवारी २०१५ रोजी जत येथे घेतला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या लेटरपॅडवर बनावट सही-शिक्का करून त्यांना नेमणूक पत्र दिले होते. या प्रकरणात विजय हणमंत जाधव (४०, रा. गावभाग, सांगली) व राहुल टिंगरे या दोघांचा सहभाग होता. यापैकी पोलिसांनी विजय जाधव यास अटक करून त्याच्याविरोधात कारवाई केली आहे. सध्या तो न्यायालयातून जामिनावर सुटून बाहेर आला आहे.
ही घटना घडल्यानंतर राहुल टिंगरे फरार झाला होता. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी टिंगरे यास आठ जानेवारीला बुधगाव येथून अटक करून, बुधवारी जत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
याप्रकरणी समीर नजीर चट्टरगी यांनी विजय जाधव व राहुल टिंगरे यांच्याविरोधात जत पोलिसात फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)
लाखाचा आगाऊ धनादेश
विजय जाधव व राहुल टिंगरे याने समीर व त्याची पत्नी रोशन यांच्याकडून एक लाख रुपयांचा आगाऊ धनादेश घेतल्यानंतर त्यांना इंग्रजी व मराठी भाषेतील बनावट लेटरपॅडवर बनावट सही-शिक्का करून नेमणूक पत्र दिले होते. हा दस्तऐवज खरा आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कोणापुढेही काही बोलू नये, अशी भीती त्यांना घालण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी कोठेही वाच्यता केली नाही. परंतु कालांतराने त्यांचा कारनामा बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.