शिपायाची नोकरी ‘अपत्या’त अडकली
By admin | Published: January 23, 2015 12:27 AM2015-01-23T00:27:41+5:302015-01-23T00:41:36+5:30
शिपाई पदासाठी असलेल्या जागेसाठी एका उमेदवाराने अर्ज केला होता.
सांगली : जिल्हा परिषदेत शिपाई पदासाठी झालेल्या परीक्षेच्या अंतिम निवड यादीतील एका शिपायाची नोकरी अपत्य संख्येच्या मुद्यावरून अडचणीत आली आहे. प्रत्यक्षात दोन अपत्ये असल्याचे सांगणाऱ्या या उमेदवाराने आपल्याला तिसरे अपत्य असून ते दत्तक दिल्याचे प्रशासनास सांगितले आहे. या प्रश्नावर कोणता निर्णय घ्यायचा, याबाबतचे मार्गदर्शन शासनाकडून मागविण्यात येणार आहे. दरम्यान, ग्रामसेवक पदासाठीच्या ४८ पदांपैकी ३८ जणांची अंतिम यादी उद्या, शुक्रवारी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
नोव्हेंबर २०१४ मध्ये जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागात कर्मचारी भरती पार पडली. त्यावेळी शिपाई पदासाठी असलेल्या जागेसाठी एका उमेदवाराने अर्ज केला होता. त्यावेळी त्याने आपल्याला दोन अपत्ये असल्याचे सांगितले होते. परंतु अर्ज छाननीवेळी त्याला तीन मुले असल्याचे लक्षात आल्याने, जिल्हा परिषद प्रशासनाने त्यास चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यामध्ये त्याने आपल्याला तीन मुले असल्याचे कबूल केले, परंतु त्यातील तिसरे अपत्य आपण दत्तक दिल्याचे सांगितले. यावर कोणता निर्णय घ्यायचा, असा पेच प्रशासनापुढे पडला आहे. शासनाकडे याबाबतचे मार्गदर्शन मागविले आहे. (प्रतिनिधी)