फिरत्या दूध संकलनातून ‘तिचा’ आत्मसन्मानाचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:27 AM2021-03-16T04:27:00+5:302021-03-16T04:27:00+5:30
विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील वर्षाराणी प्रमोद दशवंत यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात ...
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
:
बिऊर (ता. शिराळा) येथील वर्षाराणी प्रमोद दशवंत यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. फिरते दूध संकलन केंद्र त्या चालवतात. स्वत: चारचाकी गाडी चालवत वाडी-वस्तीवर जाऊन दूध गोळा करतात. चूल आणि मूल ही परंपरागत वाट सोडून त्यांनी आत्मसन्मानाचा रस्ता निवडला आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वर्षाराणी यांचे महेर शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असून, सासू जयश्री दशवंत घरची सर्व जबाबदारी पार पाडतात, तर सासरे सदाशिव दशवंत शेती सांभाळत दूध व्यवसायात मदत करतात. पती प्रमोद हे संकलित दूध मुख्य संघापर्यंत पोहोचवतात.
जेमतेम नववीपर्यंत त्यांना शिक्षण घेता आले. लग्नानंतर मात्र त्यांनी रीतसर वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन नव्या इनिंगला सुरुवात केली. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो आणि रात्री १२ वाजता मावळतो. सकाळी सातला घराबाहेर पडतात. दुपारी एक वाजेपर्यंत आणि नंतर सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत त्या दूध संकलन करतात.
दूध व्यवसायात वेळेचे गणित महत्त्वाचे असल्याचे त्या सांगतात.
वर्षाराणी यांनी सहा वर्षांपूर्वी दूध व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हा त्यांचे दूध संकलन फक्त अडीशे लिटर होते. आज त्या दररोज जवळजवळ दोन हजार लिटर दुधाचे संकलन करतात. सुरुवातीला काही दिवस ड्रायव्हर ठेवून पाहिले. नंतर त्यांनी स्वतःहून गाडीचे स्टेअरिंग हाती घेतली. आज त्यांनी सक्षमपणे एकटीने हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने उभा केला आहे. याबद्दल त्यांच्या घरच्यांना वर्षाराणी यांचे विशेष कौतुक आहे.
कोट
येत्या काळात आपण संकलित केलेल्या दुधावर प्रक्रिया करण्याचा छोटासा प्रकल्प सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यातून स्थानिक लोकांना काही प्रमाणात रोजगार मिळेल आणि उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा चांगला दर देणे शक्य होईल. शिवाय आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने आपल्याला फायदा होऊ शकतो.
- वर्षाराणी दशवंत