टेंभू योजनेच्या पाण्याचा गार्डीच्या दिशेने प्रवास
By admin | Published: March 28, 2016 11:44 PM2016-03-28T23:44:37+5:302016-03-29T00:25:45+5:30
पाणी टंचाईचे संकट दूर : करंज ओढ्यातील ३० बंधारे भरणार, ऐन उन्हाळ््यात मिळणार दिलासा
माहुली : टेंभू योजनेचे पाणी रविवारी पाटबंधारे विभागाने मुख्य कालव्याव्दारे करंज ओढ्यात सोडले असून, या पाण्याचा गार्डी (ता. खानापूर) गावाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. पाटबंधारे विभागाने रविवारी कि. मी. ११ ते २२ कि. मी. पर्यंत मुख्य कालव्यातून पाणी आणून करंज ओढ्यात सोडण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. त्यामुळे गार्डी, घानवड व हिंगणगादे या तीन गावातील करंज ओढ्यातील सुमारे ३० बंधारे टेंभूच्या पाण्याने भरणार असून, ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट दूर होणार आहे.
पाटबंधारे विभागाने टेंभूचे पाणी साळशिंगे, गार्डीच्या करंज ओढ्याकडे प्रवाहित केले आहे. आमदार अनिल बाबर यांच्या गार्डी गावच्या करंज ओढ्यात पहिल्यांदाच टेंभूचे पाणी पोहोचणार आहे. टेंभू योजनेचे आवर्तन पंधरा दिवसांपासून सुरू आहे. आटपाडी, सांगोल्याकडे जाणारा कालवा प्रवाहित करण्यात आला आहे. रविवारपासून भाग्यनगर, साळशिंगे, सांगोले, गार्डीकडे पाणी प्रवाहित करण्यात आले आहे. भाग्यनगरचा तलाव, सांगोले, वेजेगाव, गार्डी ओढ्यावरील बंधारे पाण्याने भरले जाणार आहेत. करंज ओढ्याचे दोन वर्षापूर्वी जलयुक्त शिवार योजनेतून खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, भाग्यनगरच्या तलावातही टेंभूचे पाणी सोडण्यात आले आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावानजीक असणाऱ्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना चांगल्यापध्दतीने कार्यान्वित होणार आहेत. नागेवाडी, भेंडवडे, साळशिंगे, भाग्यनगरच्या शेतकऱ्यांना पाणी उपयोगी ठरणार आहे. मुख्य कालव्यात एका पंपाव्दारे सुमारे १०० ते १२५ क्युसेक पाणी प्रवाहित करण्यात आले आहे. टेंभूचे पाणी पहिल्यांदा मुख्य कालव्यातून १० व्या कि. मी. पर्यंत आणण्यात आले होते. आता टेंभूच्या पाण्याचा ११ ते २२ कि. मी. पर्यंतच्या प्रवासाचा दुसरा टप्पा पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)
गार्डी, घानवड व हिंगणगादे या तीन गावच्या हद्दीत असणाऱ्या करंज ओढ्यात ठिकठिकाणी ३० हून अधिक बंधारे आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या ओढ्यात मोठा जलसाठा होणार असून, उन्हाळी हंगामातील पिकांसह गार्डी, घानवड, हिंगणगादे येथील पाणी टंचाई दूर होणार आहे. या पाण्याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठीही होणार असून, पशुधनाचा प्रश्न संपुष्टात येणार आहे.