उद्योग व्यवसायातून वेळ काढत 'तो' देतोय सांगलीत वाहतुक शिस्तीचे धडे
By शीतल पाटील | Published: October 7, 2023 07:25 PM2023-10-07T19:25:04+5:302023-10-07T19:25:59+5:30
सांगली : साॅफ्टवेअर इंजिनयर, त्यात स्वत:चा उद्योग.. त्यातून वेळ काढत सांगलीतील तरुण जुबेर समलेवाले हा कुटूंबासह वाहनधारकांना शिस्तीचे धडे ...
सांगली : साॅफ्टवेअर इंजिनयर, त्यात स्वत:चा उद्योग.. त्यातून वेळ काढत सांगलीतील तरुण जुबेर समलेवाले हा कुटूंबासह वाहनधारकांना शिस्तीचे धडे देत आहे. जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे फाटकावर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या कुटूंबियांचे प्रयत्नाचे कौतुक होत आहे.
सांगली-माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुल पाडण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने वाहनधारकांना जुना बुधगाव रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे. या रस्त्यावर दिवसभरात २५ ते ३० वेळा रेल्वे फाटक बंद करावे लागते. त्यामुळे रेल्वे फाटकावर वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असते. बेशिस्त वाहनचालकांमुळे फाटक उघडल्यानंतरही कोंडी सुटत नाही. वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी जुबेर समलेवाले हा तरुण धावून आला आहे.
जुबेर हा साॅफ्टवेअर इंजिनियर आहे. क्रीडा प्रशिक्षक बापू समलेवाले यांचा तो मुलगा. त्याचा स्वत:चा उद्योग आहे. तो चिंतामणीनगर येथे राहतो. उद्योग व्यवसायातून वेळ काढून सायंकाळच्या सुमारास जुबेर, त्याची आई सायरा, नातेवाईक असिफ मुजावर, मुस्तकिम मुजावर हे वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी धडपडत आहेत. हातात फलक घेऊन फाटकाच्या एका बाजूला वाहने घ्यावीत, दुसऱ्या बाजूने समोरील वाहने जातील, असे सांगून वाहनचालकांना जागे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे रेल्वे फाटकावरील वाहनांची कोंडी काही मिनिटात सुटते आणि दुचाकी, चारचाकी वाहने मार्गस्थ होतात. समलेवाले कुटूंबियांच्या या कष्टाचे वाहनधारकांतून कौतुक होत आहे.