शिराळ्यात न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी

By admin | Published: August 5, 2016 01:07 AM2016-08-05T01:07:23+5:302016-08-05T02:01:39+5:30

शेखर गायकवाड : जिवंत नागाची पूजा करण्याचा आग्रह नकोे; डॉल्बीच्या आवाजावरही कडक निर्बंध

Judicial ruling implementation in winter | शिराळ्यात न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी

शिराळ्यात न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी

Next

जगभरात प्रसिध्द असलेला शिराळा येथील नागपंचमीचा सण दोन दिवसांवर आला असून, पारंपरिक पध्दतीने जिवंत नागाची पूजा करण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत. जिवंत नागाच्या पूजेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातल्याने, प्रशासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. डॉल्बी वापरावरही प्रशासनाने अंकुश ठेवला आहे. त्यामुळे यापुढच्या सर्वच निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रश्नावर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याशी साधलेला थेट संवाद...


प्रश्न : नागपंचमी साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना काय आहेत ?
उत्तर : शिराळा येथील नागपंचमीला हजारो वर्षांपासूनचा इतिहास आहे. हे मान्य असले तरी, सर्वाेच्च न्यायालयाने मात्र नाग पकडण्यावर, त्याची पूजा करण्यावर, एकूणच त्याच्या हाताळणीवर बंदी घातली आहे. पारंपरिक पध्दतीने नागपंचमी साजरी करण्यावर ग्रामस्थ ठाम असले तरी, न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर करणे आवश्यक आहे. याबाबत ग्रामस्थांच्या भावना समजू शकतात. मात्र प्रशासनाकडून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत महसूल व पोलिस प्रशासनाच्या बैठका झाल्या आहेत. शिराळा येथील नागरिकही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखतील असा आशावाद आहे. त्याचबरोबर या कालावधित डॉल्बीच्या वापरावर निर्बंध लादण्यात आले आहेत. तीन डेसिबलपेक्षा जास्त आवाज असता कामा नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रश्न : पारंपरिक पध्दतीने नागपंचमी साजरी करण्यावर नाग मंडळे व ग्रामस्थ ठाम आहेत. यावर काय सांगाल?
उत्तर : मोठी परंपरा असलेल्या शिराळ्याच्या नागपंचमीला न्यायालयीन निर्णयाची बाधा येईल असे वाटत नाही. कारण, जिवंत नागाच्या पूजेवर ठाम राहण्यापेक्षा प्रतिकात्मक नागाच्या पूजेची प्रथा सुरू करण्यात यावी. मागच्यावर्षीही शासनाकडून न्यायालयाची बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यावर कोणताही निर्णय झाला नसल्याने, सध्या तरी तेथील ग्रामस्थांना न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करण्यावाचून पर्याय नाही. यावर निर्णय होईलच, पण तोवर सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
प्रश्न : नागपंचमीच्या प्रश्नावर नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिला आहे. याबाबत आपण नागरिकांना काय आवाहन कराल?
उत्तर : नागपंचमी साजरी करण्याची परंपरागत पध्दत आहे. या सणाशी तेथील ग्रामस्थांचे भावनिक बंध जुळलेले आहेत. त्यामुळे पारंपरिक पध्दतीने नागपंचमी साजरी करण्याची त्यांची आग्रही भूमिका समजू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्काराचा निर्णय घेऊ नये. पण शेवटी न्यायालयाने यात लक्ष घालून निर्णय दिल्याने, लोकभावनेचा विचार करताना न्यायालयीन निर्णयाचा आदर राखणेही आवश्यक आहे.
प्रश्न : प्रतिकात्मक नागांच्या पूजनाबाबत आपण केलेल्या आवाहनाबद्दल काय सांगाल?
उत्तर : नागपंचमीला असलेली हजारो वर्षांची परंपरा लक्षात घेता, नागपंचमीला जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिकृतीचा वापर करण्याच्या सूचना बैठकीत मांडल्या आहेत. गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्ती असतात. त्याचपध्दतीने आकर्षक नागप्रतिमा साकार करून हा उत्सव आनंदात साजरा केला जाऊ शकतो. त्यात आता शासनाचे सर्व नियम प्राण्यांचे हाल होऊ नयेत असे आहेत. यासाठी ग्रामस्थांनी भूमिकेत थोडा बदल करावा. शेवटी जिवंत नागाच्या पूजनावरील बंदीचा निर्णय जर शासन पातळीवरील असता, तर आंदोलन अथवा इतर पध्दतीने त्याचा निषेध नोंदविता आला असता. मात्र, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याने, याचा निषेध न करता त्याची अंमलबजावणी करणे हाच पर्याय सध्या तरी प्रशासनाकडे आहे.
- शरद जाधव, सांगली

Web Title: Judicial ruling implementation in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.