देवराष्ट्रेतील तरुणाने टाकाऊ भागांपासून अशी तयार केली ‘जुगाड जिप्सी’, भन्नाट आयडियाची कल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 02:13 PM2021-12-22T14:13:23+5:302021-12-22T14:13:59+5:30
सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला दुचाकी, चारचाकी वाहने परवडणारी नाहीत. या महागाईला कंटाळून देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील अल्पशिक्षित तरुणाने दुचाकी व चारचाकीच्या टाकाऊ सुट्या भागांपासून चारचाकी गाडी बनवली आहे.
- अतुल जाधव
देवराष्ट्रे - सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला दुचाकी, चारचाकी वाहने परवडणारी नाहीत. या महागाईला कंटाळून देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील अल्पशिक्षित तरुणाने दुचाकी व चारचाकीच्या टाकाऊ सुट्या भागांपासून चारचाकी गाडी बनवली आहे. ती बनवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला असून, तिला त्याने ‘जुगाड जिप्सी’ नाव दिले आहे.
देवराष्ट्रेतील दत्तात्रय लोहार या लोहार समाजातील तरुणाने कौशल्य वापररून कष्टाने चारचाकी तयार केली आहे. त्यांचे फॅब्रिकेशनचे छोटेसे वर्कशॉप व थोडी शेती आहे. सध्या सर्वांनाच घरी चारचाकी असावी असे वाटते; तसे दत्तात्रय यांनाही वाटत होते. परंतु बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे गाडी घेणे शक्य नव्हते. या परिस्थितीपुढे न झुकता स्वतः गाडी तयार करण्याचे त्यांनी ठरवले आणि सुरुवात केली.
फॅब्रिकेशनच्या वर्कशॉपमध्ये भंगारात पडलेल्या दुचाकी गाडीचे इंजिन व जीपचे बोनेट, रिक्षाची चाके अशी भन्नाट जुळवाजुळव करून त्यांनी टुमदार चारचाकी गाडी तयार केली. ती आकाराने नॅनो गाडीपेक्षा लहान असून, प्रतिलिटर ४० ते ४५ किलोमीटर जाते. ताशी पन्नास किलोमीटर वेगाने धावते. एका वेळेस चार माणसे बसून प्रवास करू शकतात. ही गाडी बनवण्यासाठी सुमारे साठ हजार रुपयांचा खर्च आला. ती सुरू करण्यासाठी बटन-स्टार्टरचा वापर न करता दुचाकीसारखी किक मारावी लागते. शिवाय इतर मोटारींप्रमाणे स्टेअरिंग उजव्या बाजूऐवजी डाव्या बाजूस बसवले आहे. ही अफलातून गाडी तयार करण्यासाठी त्यांना दोन महिन्यांचा कालावधी लागला. दत्तात्रय लोहार अल्पशिक्षित असून त्यांनी कोणतीही पदवी घेतलेली नाही. मात्र प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. हे त्यांनी सिद्ध केले आहे.
पवनचक्की, भांगलण यंत्राचाही प्रयोग
दत्तात्रय यांच्या मुलाने घरी चारचाकी असावी, अशी इच्छा व्यक्त होती. यातून ही कल्पना सुचली व दोन वर्षांपासून जुन्या सुट्या भागांची साठवणूक करून दोन महिन्यांत जुगाड जिप्सी तयार केली. यापूर्वी त्यांनी पवनचक्की आणि भांगलणीसाठी यंत्र तयार केले होते.