एकोणीस वर्षांत जुलै प्रथमच कोरडा, सांगली जिल्ह्यात केवळ १२ टक्के पाणीसाठा
By अशोक डोंबाळे | Published: July 14, 2023 11:52 AM2023-07-14T11:52:41+5:302023-07-14T11:53:15+5:30
दुष्काळी तालुक्यांमध्ये चारा, पाण्याची भीषण टंचाई
अशोक डोंबाळे
सांगली : गेल्या एकोणीस वर्षांत जुलै महिना प्रथमच खडखडीत कोरडा जाताना दिसत आहे. सरासरी १३५.५० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना केवळ ६९.१ टक्के म्हणजे २१.१ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्येही १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व तालुक्यामध्ये पशुधनाच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या एकोणीस वर्षांत २००३ मध्ये जून, जुलैत सर्वात कमी पाऊस झाला होता. दुष्काळाच्या झळा बसल्या होत्या. पिण्याच्या पाण्यासाठी ३३६ टँकर, चारा छावण्या आणि रोजगार हमी योजनेवर मजूर कामावर होते. त्यानंतर आतापर्यंत जून, जुलैत पावसाने हुलकावणी दिलेली नव्हती. पण या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प दिसत आहे. सर्वसाधारणपणे जुलैतच पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस पडतो.
पण, जुलै निम्मा संपत आला तरीही केवळ २१.१ टक्के पाऊस पडल्यामुळे केवळ ९ टक्के खरीप पेरण्या झाल्या आहेत. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांमुळे जिल्ह्यातील पाझर तलावात १२ टक्के पाणीसाठा दिसत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दिसत नाही. पण, ती जाणवण्याची शक्यता आहे. कोयना धरणात १८ टक्के, तर वारणा धरणात २७ टक्के पाणीसाठा आहे.
सहा वर्षांतील पाऊस (मिलिमीटर)
वर्ष - सरासरी - प्रत्यक्ष पाऊस
२०१८ - १२२ - १२९.९
२०१९ - १२२ - २१७.८
२०२० - १३५.५० - ११७.८
२०२१ - १३५.५० - ३२१.४
२०२२ - १३५.५० - १९७.९०
२०२३ - १३५.५० - ६९.१