आयुक्त-लेखापरीक्षकांत जुंपली

By admin | Published: December 11, 2014 10:38 PM2014-12-11T22:38:12+5:302014-12-11T23:50:10+5:30

‘स्थायी’त वादळी चर्चा : सत्ताधारी, विरोधक नगरसेवक आक्रमक

Jumpy Commissioner-Auditor | आयुक्त-लेखापरीक्षकांत जुंपली

आयुक्त-लेखापरीक्षकांत जुंपली

Next

सांगली : महापालिका आयुक्त अजिज कारचे व मुख्य लेखापरीक्षक एन. व्ही. कोंगळे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. लेखापरीक्षकांनी फायलीवर सह्या करण्यास नकार दिला आहे, तर आयुक्तांनी त्यांना सह्या करण्याचे लेखी आदेश काढले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टूपणामुळे विकास कामांच्या फायली खोळंबल्या असून, त्यावर आज स्थायी समितीच्या सभेत सुमारे तासभर वादळी चर्चा झाली. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपापली बाजू मांडली. पण दोघांत शेवटपर्यंत एकमत होऊ शकले नाही. कराच्या पैशातून वेतन घेणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना कामे होत नसतील, तर कशासाठी जोपासायचे? असा संतप्त सवालही सदस्यांनी केला.
सभापती संजय मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली आज, गुरुवारी स्थायीची सभा झाली. या सभेत अधिकाऱ्यांतील संघर्षावर तब्बल तासभर चर्चा झाली. नगरसेवक सुरेश आवटी यांनी आयुक्त व मुख्य लेखापरीक्षकांत सुरू असलेल्या सुप्त संघर्षावर बोट ठेवत जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, मुख्य लेखापरीक्षक आयुक्तांचे आदेश मानत नाहीत. त्यांनी फायली सह्यांसाठी आणू नयेत, असे आदेश खातेप्रमुखांना दिले आहेत, तर आयुक्तांकडून त्यांच्या सहीचा आग्रह धरला जातो. या दोघांच्या वादामुळे विकासकामांच्या फायली खोळंबल्या आहेत. नगरसेवकांची कामे होत नाहीत. हा सारा प्रकार संतापजनक आहे. पालिकेचे अधिकारी नागरिकांच्या कराच्या पैशातून पगार घेतात. जर नागरिकांच्या हिताची कामेच होणार नसतील, तर या अधिकाऱ्यांना कशासाठी जोपासायचे?,असा सवाल उपस्थित केला.
यावरून स्थायीत सर्वच सदस्य आक्रमक झाले. सभापती मेंढे यांनीही प्रशासनाची खरडपट्टी काढली. ते म्हणाले की, माझ्या सभापतीपदाच्या कारकीर्दीत असा प्रकार चालणार नाही. सर्व अधिकारी, खातेप्रमुखांनी आपापली जबाबदारी पार पाडावी. अधिकाऱ्यांनी त्यांच्यातील संघर्ष बाजूला ठेवून नागरिकांच्या हिताला प्राधान्य द्यावे. विकास कामांच्या निविदाही त्यादिवशीच फोडल्या पाहिजेत. त्यात काही अडचण असल्यास एखाद्या दिवसाची मुभा असेल. निविदा फोडण्यात दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)

दोन दिवसात फायलींचा निपटारा
सभापती मेंढे यांनी प्रशासनाकडील सर्वच फायलींचा दोन दिवसांत निपटारा झाला पाहिजे, अशी सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिली. आयुक्त अजिज कारचे हे दोन दिवसांत फायलींचा निपटारा करतात. मग खातेप्रमुखांना हे काम का जमत नाही? यापुढे फायली खोळंबल्या, तर स्थायी समितीच्या अधिकाराखाली संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

Web Title: Jumpy Commissioner-Auditor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.