जतमधील मरीआई कुटुंबावर ३० वर्षांपासून बहिष्कार, वाळीत टाकले : ‘अंनिस’कडे धाव;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 09:38 PM2018-08-30T21:38:28+5:302018-08-30T21:41:39+5:30
सांगली : जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे, जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर मरीआई (कडकलक्ष्मी) जात पंचायतीने गेल्या ३० वर्षांपासून बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. मारुती कोळी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मदत घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे जात पंचायतीच्या दहा पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
जात पंचायतीचे अण्णाप्पा लक्ष्मण कोळी (रा. चडचण, जि. विजापूर), स्वामी भीमाप्पा कोळी, दुर्गाप्पा बुडाप्पा कोळी (बरडोल, ता. इंडी, जि. विजापूर), शंकर शामराव कोळी (हलसंगी, ता. इंडी, जि. विजापूर), दुर्गाप्पा मऱ्याप्पा कोळी, दुर्गाप्पा अण्णाप्पा कोळी (मंद्रुप, जि. सोलापूर), रामू सायाप्पा कोळी, बालाप्पा शिनाप्पा कोळी (दोघे नळदुर्ग, जि. उस्मानाबाद), शिवाप्पा निंगाप्पा कोळी व मऱ्याप्पा मारुती कोळी (मधला पारधी तांडा, ता. जत) अशी पंचायतमधील दहा सदस्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तसेच खंडणीचाही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. पोलीसप्रमुख शर्मा यांनी याप्रकरणी चौकशी करुन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश जत पोलिसांना दिले आहेत.
मारुती कोळी जतमधील स्टिल कॉलनीत बुद्धव्वा व नागव्वा या दोन पत्नींसह मुली शीतल (२५), सोनल (२५), मुले राहुल (९), बालाप्पा (७) भीमान्ना (५ वर्षे) यांच्यासह राहतात. मरीआईचा (कडकलक्ष्मी) गाडा घेऊन गावोगावी देवीचा महिमा सांगून अंगावर आसूडाचे फटके मारून घेऊन धान्य व पैसे गोळा करतात. बुद्धव्वा ही त्यांची पहिली पत्नी आहे. लग्नापूर्वी बुद्धव्वा यांच्या वडिलांना रिवाजाप्रमाणे पाच हजाराची दक्षिणा दिली होती. पण जात पंचायतीस काही दिले नाही; तसेच लग्न करण्याची परवानगीही घेतली नव्हती. त्यामुळे पंचायतीने त्यांना एक लाखाचा दंड केला. हा दंड त्यांनी भरलाही. मात्र जात पंचायतीने आणखी दोन लाख रुपये दंड देण्याची मागणी केली. कोळी यांनी पैसे नसल्याचे सांगताच पंचायतीने त्यांच्यावर ३० वर्षांपूर्वी बहिष्कार टाकला होता. तो आजही कायम आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, राहुल थोरात, चंद्रकांत वंजाळे, शशिकांत सुतार, राजेंद्र मोटे, भटक्या विमुक्त जातीचे विकास मोरे यांच्यासह नितीन मोरे, गणेश निकम यांनी पोलीसप्रमुख सुहैल शर्मा यांना निवेदन दिले. यावेळी मारुती कोळी उपस्थित होते.
जात पंचायतीकडून मारहाण
कोळी यांच्या घरी नातेवाईक-पाहुण्यांना जाण्यास रोखले जाते. त्यांना समाजातील कोणत्याही सुख-दु:खाच्या कार्यक्रमावेळी बोलाविले जात नाही. एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तरी, त्याचा निरोप दिला जात नाही. कोळी यांनी याचा जाब जातपंचायतीला विचारला. पण त्या सदस्यांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. ते मुलींचा विवाह करण्याच्या प्रयत्नात आहेत, पण जातपंचायत त्यातही अडथळा आणत आहे.
पंचांपुढे नाक घासले
यावर्षी गुढीपाडव्याला जत-सातारा रस्त्यावर शेगावकडे जाणाºया रस्त्यालगत एका मैदानात जातपंचायतीची बैठक झाली. या बैठकीला मारुती कोळी कुटुंबासह गेले. ‘माझ्या दोन्ही मुलांचे लग्न करायचे आहे, आमच्यावरील बहिष्कार मागे घ्यावा’, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी पंचायतीने ‘तुम्हाला वाळीत टाकले आहे, तुमच्याशी रोटी-बेटी व्यवहार करणार नाही’, असे सांगितले. समाजात घेण्यासाठी कोळी कुटुंबाने यावेळी पंचांपुढे नाक घासले. तरीही पंचायतीने त्यांना फटकारले. दोन लाख रुपये द्या, बहिष्कार मागे घेतो, असे त्यांना सांगण्यात आले.
लग्नातून हाकलले
मारुती कोळी २५ जुलै २०१८ रोजी कण्णूर येथे चुलत भावाच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. त्यावेळी तेथे पंचायतीचे दहा पंचही लग्नास आले होते. कोळी यांना पाहून या पंचांनी त्यांना लग्नातून हाकलून लावले. दुसºया दिवशी वळसंग येथे चुलत मेहुण्याच्या लग्नाला कोळी पत्नीसह गेले होते. त्या लग्नातूनही त्यांना पंचांनी हाकलले. वºहाडी मंडळींपुढे अपमान केला. मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.