अधिकाऱ्याच्या छळाबद्दल न्याय मागितला अन् झाल्या निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:27 AM2021-04-08T04:27:44+5:302021-04-08T04:27:44+5:30
सांगली : एसटी महामंडळाच्या सांगली विभागीय कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी महिला वाहकास गेल्या दोन महिन्यांपासून त्रास देत आहे. या ...
सांगली : एसटी महामंडळाच्या सांगली विभागीय कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी महिला वाहकास गेल्या दोन महिन्यांपासून त्रास देत आहे. या छळाबद्दल महिला वाहक न्यायाची मागणी करत असताना प्रशासनाने त्या महिला वाहकासच निलंबित केल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे.
एसटी महामंडळाच्या मिरज आगारातील एक महिला वाहक दि. २९ मार्च २०२१ रोजी पुणे ते मिरज शिवशाही घेऊन येत होत्या. सातारा जिल्ह्यातील शाही सेवा या थांब्यावर बस आली असता, सांगली विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने मी सांगलीस येणार आहे, असे सांगितले. यावेळी संबंधित महिला वाहकाने या बसमध्ये स्टाफ चालत नाही, असे नम्रपणे सांगितले होते. पण, त्या अधिकाऱ्याने मला ओळखत नाहीस काय? मी वर्ग एकचा अधिकारी आहे, असे मोठ्या आवाजात बोलला. यासंबंधी महिला वाहक यांनी मिरज आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. त्यांनी त्या अधिकाऱ्यास घेऊन या नंतर पाहू, असे सांगितल्यामुळे त्यांना बसमध्ये घेतले. परंतु, बसमध्ये प्रवेश करताना त्या अधिकाऱ्याने तोंडाला मास्क लावला नव्हता. ते तोंडात काहीतरी चघळत होते व त्यांनी मध्यप्राशन केले होते. वाईट नजरेने पाहात होते. तसेच थुंकण्याचे निमित्त करून बसमध्ये सारखे ये-जा करीत होते. तुझे नाव काय, तुला येथून पुढे कशी शिवशाहीची ड्युटी लागते पहतोच, तुला निलंबितच करतो असे म्हणत आरे तुरे बोलणे सुरू केले, अशी तक्रार महिला वाहकांनी केली आहे. दोन महिन्यांपूर्वीही असाच प्रकार घडल्याचे संबंधित महिला वाहकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या सर्व प्रकाराबद्दल मी सांगली विभागीय कार्यालयाकडे न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर मलाच निलंबित केल्यामुळे मला खूप मोठा धक्का बसल्याचेही महिला वाहक म्हणाल्या.
चौकट
दोन संघटनांतील वादाचा कर्मचारी बळी
सांगली विभागातील दोन एसटी कामगार संघटनांमधील वर्चस्व वादातून कामगारांना न्याय मिळण्याऐवजी त्यांचा छळच सुरू झाला आहे. एका संघटनेची कर्मचारी असलेल्या महिलेवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गैरवर्तन, अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली आहे. तरीही त्या अधिकाऱ्यावर कारवाईसाठी शक्ती लावण्याऐवजी एका संघटनेने या अधिकाऱ्यास पाठीशी घातले. तसेच महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यास प्रशासनास भाग पाडले. संघटनांच्या या भूमिकेबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे.