अल्पवयीनांची गुन्हेगारीत एंट्री; शिक्षा होणार नाही सांगून करवून घेतले जाताहेत गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 06:07 PM2021-11-23T18:07:40+5:302021-11-23T18:08:04+5:30

शरद जाधव सांगली : अजाणत्या वयात नको ती संगत आणि उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारीत अडकत आहेत. ...

Juvenile delinquent entry; Crimes are committed by saying that there will be no punishment | अल्पवयीनांची गुन्हेगारीत एंट्री; शिक्षा होणार नाही सांगून करवून घेतले जाताहेत गुन्हे

अल्पवयीनांची गुन्हेगारीत एंट्री; शिक्षा होणार नाही सांगून करवून घेतले जाताहेत गुन्हे

googlenewsNext

शरद जाधव
सांगली : अजाणत्या वयात नको ती संगत आणि उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारीत अडकत आहेत. अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करून घेण्याचेही प्रमाण वाढले असून शिक्षा होणार नाही असे सांगून त्यांना यात ओढले जात आहे. मात्र, १६ वर्षांवरील मुलांकडून गुन्हा घडल्यास व तो न्यायालयात सिद्ध झाल्यास शिक्षेची तरतूद २०१५ पासून लागू झाली आहे.

अल्पवयीन मुलांकडून गुन्हे करून घेतल्यास त्यांना शिक्षा होणार नाही अथवा झाली तरी ती कमी स्वरूपाची असल्याने अनेकजण आपला हेतू साध्य करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करून घेतात. पौगंडावस्थेत असलेले हे तरुण क्षणिक आकर्षणापोटीच गुन्हेगारीत अडकत चालल्याने बाल न्याय मंडळाच्या माध्यमातून समुपदेशनाचे काम सुरू आहे.

गंभीर गुन्ह्यातही अल्पवयीनांचा सहभाग

खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यासह इतर गंभीर गुन्ह्यांतही अल्पवयीनांचा सहभाग करून घेतला जातो. गेल्याच आठवड्यात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर दोघा अल्पवयीनांनी हल्ला केला. यातील मुख्य संशयिताने अल्पवयीनांकडून हे कृत्य करून घेतले होते.

आकड्यांबाबत गोपनीयता

सन २०१५ मध्ये झालेल्या कायद्यातील तरतुदी आणि बदलानुसार जिल्ह्यातील अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या, त्यांनी केलेले गुन्हे आणि त्यांना झालेली शिक्षा याची कोणतीही माहिती देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

शब्दातील बदलही आश्वासक

अल्पवयीन मुलांकडून गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यास बालसुधारगृहात दाखल केले जाते. यास पूर्वी ‘रिमांड होम’ असे म्हटले जात असे. आता नवीन कायद्यानुसार ‘रिमांड होम’ शब्दाचा वापर करणे गुन्हा असून, त्याऐवजी सुधारगृह म्हणण्याच्या सूचना आहेत. याशिवाय अल्पवयीन गुन्हेगारांना ‘बाल गुन्हेगार’ असे न म्हणता ‘विधिसंघर्षग्रस्त बालक’ म्हणावे अशीही सूचना आहे.

मोबाईल, टीव्ही आणि कौटुंबिक वातावरण

कमी वयात गुन्हेगारीत मुलांचे वाढलेले प्रमाण यासाठी सभोवतालचे वातावरणही तितकेच कारणीभूत आहे. टीव्हीवरील हिंसक मालिका आणि कार्यक्रम पाहून अनेक मुले प्रेरित होतात, तर घरातील पालकांचे आपला मुलगा काय करतो याकडे लक्ष नसल्यास ही मुले गुन्हेगारीकडे वळतात. त्यात मुलांचे व्यक्तिमत्त्व घडण्याच्या वयात मुलांना मिळणारी संगत महत्त्वाची ठरते.

मंडळ करते अभ्यास

- अल्पवयीन गुन्हेगारांना प्रवाहात आणण्यासाठी बाल न्याय मंडळ काम करते.

- पोलिसांकडून अल्पवयीनास मंडळासमोर हजर केले जाते. यावेळी ते समुपदेशकामार्फत समुपदेशन करून त्याचे पुनर्वसन करण्यात येते.

मुलांच्या पुनर्वसनास प्राधान्य

- गंभीर गुन्ह्यात ‘प्रिलिमिनरी असेसमेंट’ द्वारे मुलाचे कृत्य सज्ञानाप्रमाणे आहे का याची तपासणी केली जाते व त्याच्यावर खटला दाखल केला जातो. यातून शिक्षाही होते.

- गुन्हेगारीत ओढलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठीही मंडळाकडून प्रयत्न केले जातात.

बाल न्याय मंडळाकडून गुन्हेगारीत आलेल्या बालकांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांच्या आवडीनुसार त्यांना मार्गदर्शनही केले जाते. - ॲड. एस. एम. पखाली, सदस्य, बाल न्याय मंडळ, सांगली

Web Title: Juvenile delinquent entry; Crimes are committed by saying that there will be no punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.