जतमध्ये विवाहितेची तीन मुलासह आत्महत्या; कौटृंबिक वादातून कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:26 PM2018-10-19T12:26:04+5:302018-10-19T12:30:07+5:30
कौटूंबिक वादातून जत येथील राधा सुभाष कोळी (वय ३२) या विवाहितेने तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
सांगली : कौटूंबिक वादातून जत येथील राधा सुभाष कोळी (वय ३२) या विवाहितेने तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
राधा कोळी, त्यांची मुले यश (४ महिने), आराध्या (३ वर्षे) व प्रज्वल (४ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. राधा कोळी कुटूंबासह जतमधील मंगळवार पेठेतील कोळी गल्लीत राहत होत्या. त्यांच्या पतीचा बांधकामावर लिफ्ट पुरविण्याचा व्यवसाय आहे.
राधा यांचे सोलापूर जिल्ह्यातील माहेर आहे. सात वर्षापूर्वी त्यांचा सुभाष कोळी यांच्याशी विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यापासून कौटूंबिक कारणावरुन राधा व सुभाष यांच्यात वाद सुरु होते. गुरुवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून राधा तिनही मुलांना घेऊन रात्री दहा वाजता घरातून बाहेर पडल्या. पतीने मध्यरात्रीपर्यंत शोध घेतला. पण राधा व मुलांचा सुगावा लागला नाही.
शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता जतमधील यल्लमा मंदिर परिसरातील सार्वजनिक विहिरीत यश या चार महिन्याच्या चिमुरड्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावरुन राधाने मुलांसह आत्महत्या केल्याचा संशय आला.
जत पोलीस, स्थानिक नागरिक व नगरपालिका यांनी संयुक्तपणे मोहिम राबवून राधा, आराध्या व प्रज्वलचा शोध सुरु ठेवला. साडेअकरा वाजता राधाचा मृतदेह सापडला. आराध्या व प्रज्वलचा शोध सुरु आहे. विहिरीकाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर राधा यांनी मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.