‘लोकमान्य’चे के. सी. वग्यानी पतसंस्था नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:23+5:302021-01-01T04:18:23+5:30
आष्टा : येथील आष्टा लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेचे १ जानेवारी २०२१ पासून संस्थेचे संस्थापक स्वर्गीय के. सी. वग्यानी ...
आष्टा : येथील आष्टा लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेचे १ जानेवारी २०२१ पासून संस्थेचे संस्थापक स्वर्गीय के. सी. वग्यानी लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था असे नामकरण करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष महावीर आवटी व मुख्य व्यवस्थापक वाय. एस. राजोबा यांनी दिली.
महावीर आवटी म्हणाले, आष्टा सहकार पंढरीत लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेने गोरगरिबांना आर्थिक आधार देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. के. सी. वग्यानी यांनी १९८२ मध्ये संस्थेचे रोपटे लावले सुरुवातीपासूनच सचोटी, प्रामाणिकपणा व आर्थिक शिस्त या तीन गोष्टीवर भर देऊन गुणात्मक व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्याने संस्था लोकमान्य झाली. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात संस्थेचा विस्तार झाला आहे. संस्थेचे भागभांडवल १ कोटी ८७ लाख, ठेवी ५४ कोटी, कर्जे ३८ कोटी व खेळते भांडवल ६७ कोटी इतके आहे. संस्थेने महापूर, कोरोना संकटात ९७ टक्के कर्ज वसुली केली आहे.
संस्थापक के. सी. वग्यानी यांचे २ जून २०१९ रोजी आकस्मिक निधन झाले. संस्था उभारणीत व ती भरभराटीला आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
वाय. एस. राजोबा म्हणाले, लोकमान्य संस्थेला के. सी. वग्यानी यांचे नाव द्यावे, अशी सभासदांतून मागणी झाल्याने संस्थेच्या सर्वसाधारण सभेत लोकमान्य नागरी पतसंस्था याऐवजी स्वर्गीय के. सी. वग्यानी लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था असे १ जानेवारीपासून नामकरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. निवृत्त न्यायमूर्ती भालचंद्र वग्यानी, सर्व संचालक, सभासद, कर्मचारी यांच्या सहकार्याने संस्थेने प्रगती साधली आहे.