ग्रामीण भागात कबड्डीला ‘अच्छे दिन’
By admin | Published: March 28, 2016 11:48 PM2016-03-28T23:48:58+5:302016-03-29T00:10:56+5:30
आयोजनाचे प्रमाण वाढले : युवा खेळाडूंना प्रोत्साहन
सहदेव खोत -- पुनवत --गेल्या दोन वर्षापासून देशपातळीवर आयोजित होत असलेल्या प्रो-कबड्डी स्पर्धांमुळे या खेळाची लोकप्रियता वाढत चालली असून, ग्रामीण भागसुद्धा याला अपवाद राहिलेला नाही. ग्रामीण भागात यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने कबड्डी स्पर्धांचे वाढते आयोजन पाहिल्यानंतर या खेळाला ‘अच्छे दिन’ आल्याचे जाणवत आहे.
कबड्डी हा खेळ तसा आशियाई देशामधील खेळ असून, तो आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहोचला आहे. पूर्वी महाराष्ट्रात ‘हुतूतू’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या खेळाला १९३८ मध्ये राष्ट्रीय खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आले. परंतु सर्वत्र क्रिकेट या खेळाची क्रेझ असल्याने या खेळाकडे खेळाडूंचा ओढा कमी राहिला.
गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर ‘प्रो-कबड्डी लीग’ या स्पर्धांचे आयोजन होत आहे. या स्पर्धा दूरचित्रवाणीवरुन घराघरात पोहोचल्यानंतर हा खेळ युवा खेळाडूंच्या मनात भरू लागला आहे. त्यातच जिल्ह्यातील ग्रामीण भागातून काशिलिंग आडके व नितीन मदने असे खेळाडू कबड्डी खेळातून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत चमकल्याने शेकडो कबड्डीपटूंच्या मनात त्यांचा आदर्श निर्माण झाला.
सध्या ग्रामीण भागात गावोगावच्या यात्रा, महोत्सवाचे दिवस असून, अनेक गावात आता कबड्डी स्पर्धांचे आयोजन होऊ लागले आहे. कबड्डी खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे गावागावात युवकांचे संघ तयार झाले आहेत. अनेक खेळाडूंना यामुळे व्यासपीठ मिळू लागले आहे. गावागावातील कबड्डीच्या जुन्या-जाणत्या खेळाडूंनीही या खेळामध्ये लक्ष घालून नवीन खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. आयोजकांतर्फे या स्पर्धांसाठी एकूण एक लाखाच्यावर बक्षिसे ठेवली जात आहेत. कुस्तीतले अनेक युवा मल्लही कबड्डी खेळाकडे आकर्षित झाले आहेत.
एकंदरीत कबड्डी स्पर्धांच्या आयोजनामुळे शाळा, महाविद्यालये, विद्यापीठस्तरीय स्पर्धांमध्येही खेळाडूंचा सहभाग वाढला असून, सध्या तरी ग्रामीण भागात अन्य खेळांऐवजी कबड्डी खेळाचीच चलती असल्याचे जाणवत आहे.
प्रो-कबड्डी स्पर्धांमुळे अनेक खेळाडू या खेळाकडे आकर्षित झाले आहेत. अनेक ठिकाणच्या कबड्डी असोसिएशन व प्रशिक्षण केंद्रामधून चांगले खेळाडू तयार होत आहेत. युवकांनी या खेळाकडे आता लक्ष दिल्याने सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंनाही राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याच्या संधी आहेत.
- भीमराव बांदल, प्रशिक्षक, शंभूराजे स्पोर्टस्, बिळाशी