कदम-देशमुख गटात रंगणार परंपरागत सत्तासंघर्ष...

By admin | Published: July 4, 2016 10:14 PM2016-07-04T22:14:31+5:302016-07-05T00:29:38+5:30

कडेगाव, नगरपंचायत संभाव्य चित्र

Kadam: Deshmukh will be playing traditional party | कदम-देशमुख गटात रंगणार परंपरागत सत्तासंघर्ष...

कदम-देशमुख गटात रंगणार परंपरागत सत्तासंघर्ष...

Next

प्रताप महाडिक -- कडेगाव नगरपंचायतीची पहिली निवडणूक नोव्हेंबरमध्ये होत आहे. यामुळे कडेगाव शहराचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार? कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवड निवडून आलेले नगरसेवक बहुमताने करतील, असा सुधारित अध्यादेश निघाला आहे. नगरपालिकेप्रमाणे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा नियम नगरपंचायतीसाठी लागू नाही. निवडून आलेले नगरसेवक बहुमताने नगराध्यक्षाची निवड करतील. प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक, याप्रमाणे कडेगाव येथे १७ प्रभागांतून १७ नगरसेवकांची निवड होणार आहे.
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे कडेगावची नगरपंचायत निवडणूक ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, युवा नेते धनंजय देशमुख यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी कडेगाव नगरपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी आघाडी शासनाच्या काळात तसेच सध्या सत्ताधारी भाजपच्या काळात कडेगाव शहरातील विकासकामे, सामाजिक शांतता, राजकीय घडामोडी आदी बाबीत बारकाईने लक्ष घालून सातत्याने संपर्क ठेवला आहे. टेंभू योजनेच्या पाण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला आहे.
माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगावला राजकीय राजधानी मानून मोठा विकास केला. कडेगाव तालुक्याची निर्मिती, विविध शासकीय कार्यालयांची मंजुरी आणि इमारतीची उभारणी यासाठी पुढाकार घेतला. टेंभू योजनेसाठी मंत्रिपदावर असताना निधीसाठी पाठपुरावा केला. ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, युवक नेते विश्वजित कदम यांचाही कडेगावातील विकासकामे, तसेच राजकीय घडामोडींशी सातत्याने संपर्क असतो.
रस्त्याचे चौपदरीकरण, अद्ययावत बस स्थानकाची उभारणी ही कामे मंजुरीसाठी, पूर्णत्वासाठी पतंगराव कदम यांनी पुढाकार घेतला. कडेगाव येथील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी विकास कामांच्या मुद्यावर निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. दीपक भोसले यांनी नुकतीच कडेगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. यावेळी आ. पतंगराव कदम, डॉ. विश्वजित कदम, डॉ. जितेश कदम आदी नेतेमंडळी उपस्थित होती. याबाबतही कडेगाव नगरीत चर्चा होत आहे.
पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये गेल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद मर्यादित झाली आहे. यामुळे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड, युवक जिल्हाध्यक्ष शरद लाड यांना कडेगावमध्ये लक्ष घालावे लागणार आहे.


काँग्रेस एकसंध ठेवण्याचे आव्हान
ग्रामपंचायत निवडणुका पॅनेलच्या चिन्हावर लढविल्या जातात. परंतु आता कडेगाव नगरपंचायतीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविली जाणार आहे. यामुळे कॉँग्रेसच्या हाताला साथ मिळणार, की भाजपचे कमळ फुलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस एकसंध ठेवण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम सर्व कॉँग्रेस कार्यकर्त्यांना काय उपदेश देणार, यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.


कडेगाव शहरात आता नगरपंचायतीच्या निवडणुकीचा ज्वर फुलू लागला आहे. येथे माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळीही निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आहेत. शिवसेनेची भूमिकाही अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यांची ताकदही मर्यादितच आहे. सध्या पक्षाचे बिल्ले दाखवत निवडणुकीची तयारी सुरू असली तरी, निवडणुकीत कदम विरूध्द देशमुख असाच सामना रंगणार आहे.

मोर्चेबांधणीला वेग
काँग्रेस व भाजप दोन्ही बाजूनी नगरपंचायतीच्या सत्तेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. पूर्वानुभव लक्षात घेता, काँग्रेसपुढे गटबाजी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकद येथे मर्यादित आहे. आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी काँग्रेस एकसंध ठेवून ताकदीने निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आहेत, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही कडेगावची सत्ता काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. काँग्रेसने मेळावे तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकांवर जोर दिला आहे, तर भाजपकडून थेट मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी नगरपंचायत निवडणूक पारंपरिक विरोधकांमध्येच चुरशीने होणार, हे स्पष्ट आहे.

Web Title: Kadam: Deshmukh will be playing traditional party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.