कडेगाव शहराचा सर्वांगीण विकास करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:24 AM2021-04-14T04:24:09+5:302021-04-14T04:24:09+5:30
कडेगाव : नगरपंचायतीच्या माध्यमातून कडेगाव शहराचा सर्वांगीण व चौफेर विकास करणार आहोत, अशी ग्वाही नूतन नगराध्यक्षा संगीता राऊत यांनी ...
कडेगाव : नगरपंचायतीच्या माध्यमातून कडेगाव शहराचा सर्वांगीण व चौफेर विकास करणार आहोत, अशी ग्वाही नूतन नगराध्यक्षा संगीता राऊत यांनी दिली.
कडेगाव पाणी संघर्ष समितीतर्फे मंगळवारी नगरपंचायत कार्यालयात नूतन नगराध्यक्षा संगीता राऊत व उपनगराध्यक्ष दिनकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संगीता राऊत बोलत होत्या. यावेळी रघुनाथ गायकवाड, मोहन जाधव, आप्पासाहेब यादव, आदी उपस्थित होते.
संगीता राऊत म्हणाल्या, कडेगाव शहरात विविध विकासकामांचा विकास आराखडा तयार करून आमदार मोहनराव कदम, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी विकास साधला जाईल. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना, हद्दवाढ, भाजी मंडई, बागबगीचा, मुख्य बाजारपेठेत सम-विषम पार्किंग, रस्त्याकडेला वृक्षारोपण, आदी अनेक विकासकामांना प्राधान्य दिले जाईल.
उपनगराध्यक्ष दिनकर जाधव म्हणाले, नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे केली जातील. लोकाभिमुख व पारदर्शक कारभार केला जाईल.
पाणी संघर्ष समितीचे डी. एस. देशमुख म्हणाले, नगरपंचायत ही शहराची मातृसंस्था आहे. तेव्हा प्रशासनाने विविध विकासकामे राबवून नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात हयगय करू नये.
यावेळी राजेंद्र राऊत, आनंदराव डांगे, दीपक शेडगे, अभिमन्यू वरुडे, दीपक न्यायनीत, वैभव देसाई, सुनील पवार, आदी उपस्थित होते. विठ्ठल खाडे यांनी आभार मानले.