कडेगावमध्ये महिलांनी सर्व दारू दुकानांना ठोकले टाळे

By admin | Published: May 11, 2017 06:45 PM2017-05-11T18:45:09+5:302017-05-11T18:45:09+5:30

दारूबंदीसाठी आक्रमक झालेल्या कडेगाव येथील रणरागिणींनी नगरपंचायत व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि थेट शहरातील सर्व दारू दुकाने तसेच बिअर बारना टाळे ठोकले.

In Kadegaon, women blocked all liquor shops | कडेगावमध्ये महिलांनी सर्व दारू दुकानांना ठोकले टाळे

कडेगावमध्ये महिलांनी सर्व दारू दुकानांना ठोकले टाळे

Next

कडेगाव : दारूबंदीसाठी आक्रमक झालेल्या कडेगाव येथील रणरागिणींनी नगरपंचायत व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि थेट शहरातील सर्व दारू दुकाने तसेच बिअर बारना टाळे ठोकले.
गुरुवारी सकाळी १० वाजता अचानक संतप्त शेकडो महिला व ग्रामस्थ शिवाजी चौकात एकत्र आले. त्यानंतर दारूची बाटली आडवी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत कडेगाव नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये नगरसेविका अश्विनी वेल्हाळ-परदेशी, अनिता देशमुखे, शांता घाडगेंसह शेकडो महिलांनी आणि ग्रामस्थांनी भाग घेतला.
सुरुवातीला हा मोर्चा शिवाजी चौकातून निघून कडेगाव नगरपंचायतीवर गेला. तेथे नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा जाधव म्हणाल्या की, मी तुमच्याशी सहमत आहे. दारू दुकाने बंद करण्यात यावीत, म्हणून ठराव मंजूर करून तो पाठविला जाईल.
मात्र आजच्या आज दारू दुकाने बंद झाली पाहिजेत, असा आग्रह संतप्त महिलांनी धरला आणि तेथून हा मोर्चा थेट बाजारपेठेतील दारू दुकानाकडे वळला. तेथील देशी दारूच्या दुकानाला टाळे ठोकल्यानंतर आंदोलकांनी शहरातील सर्व बिअर बारनाही टाळे ठोकले.
यापूर्वी कडेगावातील संतप्त महिलांनी कडेगाव येथील अन्य एका दारूच्या दुकानाला टाळे ठोकले होते. तेव्हा कडेगावातील सर्व दारू दुकाने बंद करावीत म्हणून तहसीलदार अर्चना शेटे यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु शासनपातळीवर तसे न केल्याने गुरुवारी संतप्त महिलांनी कडेगावातील सर्व दारू दुकाने बंद केली.
यावेळी अश्विनी वेल्हाळ-परदेशी, शुभांगी डांगे, संजीवनी डांगे, राजश्री पतंगे, शरयू गायकवाड, सुलोचना मोरे, कविता जरग, सरिता गाढवे, संगीता जाधव, चिमुताई जाधव, अंजली गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या

Web Title: In Kadegaon, women blocked all liquor shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.