कडेगावला टेंभू योजना, महावितरणविरोधात आत्मक्लेश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:19+5:302021-06-06T04:20:19+5:30
कडेगाव पाणी संघर्ष समितीने पाणीप्रश्नी टेंभू योजना व वीजप्रश्नी महावितरण विरोधात जेव्हा आंदोलने केली, त्यावेळी दोन्ही विभागांनी केवळ ...
कडेगाव पाणी संघर्ष समितीने पाणीप्रश्नी टेंभू योजना व वीजप्रश्नी महावितरण विरोधात जेव्हा आंदोलने केली, त्यावेळी दोन्ही विभागांनी केवळ आश्वासने दिली. प्रत्यक्षात मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांनी शनिवारपासून कडेगावला त्यांच्या निवासस्थानी मौन व आत्मक्लेश आंदोलन सुरू केले.
आंदोलन सुरू करण्यापूर्वी देशमुख म्हणाले, कडेगाव ते कडेपूर कॅनॉल पाईपलाईन टाकून बंदिस्त करावा. या कॅनॉलची हद्द निश्चित करून अतिक्रमण काढावे.
सुर्ली कालव्याचे अस्तरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्याची डागडुजी करावी. या कॅनॉलचे उर्वरित कामही पूर्ण करावे.
कडेगाव व गायकवाड तलाव यावर वाढलेली झाडे तोडावीत. शेतीपंप विभागातील वायरी तुटून अनेक ठिकाणी खाली पडल्या आहेत. शेतीपंपास अव्वाच्या सव्वा बिले दिली जात आहेत. ती कमी करावीत. या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात, अन्यथा टेंभू व महावितरणविरोधात आंदोलनाची धार तीव्र करण्यात येईल.
दरम्यान, देशमुख यांच्या आंदोलनाला विविध संघटना व नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला.
फोटो ओळी
: कडेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांनी टेंभू योजना व महावितरण विरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. यावेळी विविध संघटनांनी पाठिंबा दिला.