‘सागरेश्वर’मधून काळवीट नामशेष
By admin | Published: March 16, 2016 10:23 PM2016-03-16T22:23:42+5:302016-03-16T23:41:40+5:30
अभयारण्यात प्राणीगणना : हरणांची संख्या घटली
अतुल जाधव-- देवराष्ट्रे
यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये नुकतीच प्राणीगणना पार पडली. यामध्ये काळवीट जातीची हरणे अभयारण्यातून पूर्णपणे बाहेर पडल्याचे दिसत आहे, तर मागील वर्षाच्या तुलनेत चितळ जातीच्या हरणांची संख्याही घटल्याचे दिसत आहे. चाऱ्याअभावी बाहेर पडणाऱ्या हरणांचे वाढते प्रमाण आणि मोकाट कुत्र्यांकडून होत असलेली शिकार ही मुख्य कारणे यामागे असल्याचे जाणकारांचे मत आहे.
सुरुवातीच्या काळात अभयारण्यात चितळ, सांबर आणि काळवीट जातीच्या हरणांच्या बारा जोड्या सोडण्यात आल्या होत्या. अभयारण्यातील एका विशिष्ट जागी (मृगविहार) तारेचे कुंपण घालून त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा विरोध असतानाही ही हरणे मुक्त करण्यात आली. हरणांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत गेली आणि अभयारण्यात पोषक चारा आणि पाण्याची कमतरता जाणवू लागली. त्यानंतर बहुतांशी हरणे अभयारण्याच्या बाहेर पडली. चारा आणि पाण्याच्या शोधार्थ असलेल्या प्राण्यांना मोकाट कुत्र्यांमुळे प्राणाला मुकावे लागले आहे.
नुकतीच वन विभागाने प्राण्यांची गणना केली असून, यामध्ये २००८ च्या तुलनेत प्राण्यांचे प्रमाण घटल्याचेच वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या वनमंत्री पदाच्या कार्यकालात अभयारण्याचा खऱ्याअर्थाने विकास केला. कोट्यवधींची विकासकामे केली, मात्र प्रशासनाने बाहेरील हरणे अभयारण्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. २००८ मध्ये अभयारण्यात २२९ सांबर, ३२८ चितळ आणि २५० काळवीटांची संख्या होती. २०१६ मध्ये झालेल्या गणनेमध्ये मात्र अभयारण्यामध्ये काळवीट जातीची हरणे अजिबात पाहावयास मिळत नाहीत. तसेच चितळ ११६ व सांबर ४३८ आढळून आली. यातून चितळांची संख्याही घटल्याचे दिसत आहे.
अभयारण्याबाहेर हरणे : प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रत्यक्षात अभयारण्याबाहेर हरणांची संख्या लक्षणीय आहे. माळरानावर कळपाने हरणे फिरताना दिसत आहेत. मोकाट हरणांकडून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. खरे तर अभयारण्याला चेनलिंक जाळीचे कुंपण घालताना बाहेरील हरणांना अभयारण्यात घेणे गरजेचे होते. मात्र तसे झालेले नाही. त्यावेळी ही बाब प्रशासनाच्या का लक्षात आली नाही? हा प्रश्नच आहे. यामुळे निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.