कलिंगड, पपई उत्पादक वेठीस
By admin | Published: July 23, 2016 10:11 PM2016-07-23T22:11:41+5:302016-07-23T23:55:05+5:30
नियमनमुक्तीचा शेतकऱ्यांना फटका : आवक वाढल्याने दराची घसरण
कलिंगड, पपई उत्पादक वेठीस
नियमनमुक्तीचा शेतकऱ्यांना फटका : आवक वाढल्याने दराची घसरण
दादा खोत ल्ल सलगरे
राज्यभरात अडत्यांनी फळभाज्या नियमन मुक्तीविरोधात बंद पुकारला. यावर उपाययोजना म्हणून शासनाने शेतकऱ्यांना राज्यात व मुंबईतील विविध मंडईत थेट मालाची विक्री करण्यास परवानगी दिली. ‘शासनाच्या या धोरणाचा शेतकऱ्यांना लाभ’, अशा बातम्याही प्रसारमाध्यमातून दाखविण्यात आल्या. पण राज्यात पावसाचे वातावरण असताना, या पुकारलेल्या बंदचा आणि शासन निर्णयाचा फटका कलिंगड, पपई या पिकांना बसला आहे.
राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण असताना, मुंबईसारख्या मार्केटमध्ये आवक मर्यादित होती. पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढल्यामुळे दरांची झालेली घसरण यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमनमुक्त बाजारपेठेचा अध्यादेश आणि व्यापाऱ्यांचा संप याचा सर्वाधिक फटका कलिंगड व पपई यासारख्या फळपिकांना बसला आहे.
कलिंगड, पपईसारख्या पिकांचे हार्वेस्टिंग एकाच वेळेला होत असल्याने शेकडो टन माल बाजारात नेऊन मार्केटिंग करणे शेतकऱ्यांना शक्य होणे कठीण बनले आहे. मिरज पूर्व भागासह सांगली जिल्ह्यातील पश्चिम भाग शिरोळ तालुक्यातील सर्वच भाजी उत्पादक व कलिंगड, पपई उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. रमजानचा महिना लक्ष्य करून पपई, कलिंगड या पिकांच्या लागणी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. जूनपासून कलिंगडांचे मार्केट स्थिर होते. १४ ते १५ रुपये किलो असा सरासरी दर असल्याने शेतकरी आनंदित होते.
परंतु ऐन रमजानच्या शेवटी शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात अडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे व मार्केटमधील गोंधळामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. बंद मिटल्यानंतर कलिंगडाचा दर ५ ते ६ रुपयांपर्यंत घसरला. शेतकऱ्यांनी माल पाठविलेल्या गाड्यांचे भाडे व उत्पादन खर्चही त्यातून निघणार नाही, अशी स्थिती आहे.
पपई पिकाचीही हीच परिस्थिती आहे. मिरज पूर्व भागामध्ये बेळंकी, सलगरे, चाबुकस्वारवाडी या परिसरात कित्येक टन माल शेतामध्ये पडून आहे. मान्सूनचा अचानक वाढलेला पाऊस आणि शासनाची बाजारपेठ नियमनमुक्ती, व्यापाऱ्यांनी केलेले बंद आंदोलन अशा कात्रीत सापडल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले. यामुळे कलिंगड व पपई उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
मार्केटिंगची गरज : नुकसानीचे काय?
शेतीमालाचे उत्पादन आणि व्यवस्थापन या प्रक्रियेमधून शेतकऱ्यांना मार्केटिंग करण्यास पुरेसा वेळ आहे काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांचे भले होणार असले तरी, या परिस्थितीने फळपिकांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही.
सहा एकर कलिंगडाच्या लागवडीतून उत्पादन खर्च वजा जाता १२ लाख रुपये निव्वळ उत्पन्नाची अपेक्षा असताना, बाजारपेठेतील गोंधळामुळे एक किलोही माल विकला नाही व एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही. १७५ टन माल शेतात तसाच पडून आहे. याला जबाबदार कोण?
- बसगौंडा गुंडेवाडी, कलिंगड उत्पादक, चाबुकस्वारवाडी