कमळापुरात पत्नी, मेहुण्यावर कुऱ्हाडीने हल्ला

By Admin | Published: December 13, 2015 01:09 AM2015-12-13T01:09:15+5:302015-12-13T01:09:15+5:30

दोघेही गंभीर : दुहेरी खुनाचा प्रयत्न; हल्लेखोर विटा पोलिसांत हजर

At Kamalapur, Kurhadi attacked wife, brother-in-law | कमळापुरात पत्नी, मेहुण्यावर कुऱ्हाडीने हल्ला

कमळापुरात पत्नी, मेहुण्यावर कुऱ्हाडीने हल्ला

googlenewsNext

विटा : खानापूर तालुक्यातील कमळापूर येथे विलास खाशाबा साळुंखे (वय ६२) याने पत्नी व बहिणीच्या पतीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी चिंगूताई विलास साळुंखे (५५, रा. कमळापूर) व बहिणीचा पती नानासाहेब ऊर्फ भाऊसाहेब तुकाराम देवकर (६०, मूळ गाव वेजेगाव, ता. खानापूर) गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कमळापूर ते आळसंद रस्त्यावरील वडाचा मळा येथे घडली. घटनेनंतर हल्लेखोर स्वत: विटा पोलिसांत हजर झाला.
भरदिवसा घडलेल्या या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, मेहुणे नानासाहेब देवकर आमच्या कुटुंबात भांडणे लावत असल्यामुळेच कुऱ्हाडीने घाव घातल्याचे हल्लेखोर विलासने पोलिसांना सांगितले असले, तरी घटनेमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
कमळापूर येथील वडाचा मळा नावाच्या वस्तीवर विलास साळुंखे याचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्याच्या बहिणीचे निधन झाल्याने वेजेगाव येथील बहिणीचा पती नानासाहेब कमळापूर येथे अधूनमधून राहण्यास येतात. गेल्या महिन्याभरापासून ते विलासच्या घरी राहण्यास होते. शनिवारी सायंकाळी नानासाहेब घरात असताना विलासने अचानक त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने दोन घाव घातले. या हल्ल्यात नानासाहेब यांच्या मेंदूला इजा पोहोचल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यावेळी आवाज झाल्याने अंगणात असलेली विलासची पत्नी चिंगूताई घरात जात असतानाच विलासने पाठीमागून येऊन त्यांच्याही पाठीवर कुऱ्हाडीने घाव घातला. त्यात त्याही गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर विलास दुचाकी घेऊन थेट विटा पोलिसांत हजर झाला.
चिंगूताई यांच्या सून रूपाली जनावरांच्या गोठ्यात साफसफाई करीत असताना ही घटना त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी शेजारचे लोक जमा झाले. जखमींना प्रथम विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दोघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना मिरजच्या वॉन्लेस रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. नानासाहेब देवकर यांची प्रकृती चिंताजनक आहे.
घरात भांडणे लावत असल्याच्या संशयावरून वाद
देवकर यांना दोन मुले असून, एक मुलगा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे सोने-चांदी गलाई व्यवसायात आहे, तर दुसरा मुलगा वेजेगाव येथे शेती करतो. पत्नीचे निधन झाल्यानंतर देवकर अधूनमधून कमळापुरात राहण्यास येत होते. ते कमळापुरात येऊन घरात भांडणे लावत असल्याचा संशय विलासला होता. त्यामुळे तो त्यांना कमळापुरात येण्यास विरोध करत होता. त्यातूनच त्यांच्यात वाद झाल्याने नानासाहेब यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. पत्नी चिंगूताई हिलाही रागाच्या भरात पाठीत कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याचे विलासने पोलिसांना सांगितले.
 

Web Title: At Kamalapur, Kurhadi attacked wife, brother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.