सांगलीत जिल्हा परिषदेत कमळ फुलले!
By Admin | Published: February 23, 2017 07:16 PM2017-02-23T19:16:47+5:302017-02-23T19:16:47+5:30
भाजपला ६० पैकी २५ जागा : राष्ट्रवादी, काँग्रेसला धक्का, बालेकिल्ले ढासळले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खाते खोलले शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तेथील तिन्ही जिल्हा परिषद गटात भगवा फडकवला
सांगली : जिल्हा परिषदेत जोरदार मुसंडी मारत भाजपने ६० जागांपैकी २५ जागा जिंकल्या असून, पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलवत थेट सत्तेवर दावा केला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीसह दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीला १५ तर, काँग्रेसला १० जागा मिळाल्या. रयत विकास आघाडीने चार, शिवसेनेने तीन, अजितराव घोरपडे गटाने दोन, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्षाने प्रत्येकी एक जागा पटकावली. वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळचे गड राष्ट्रवादीने राखले, तर खानापुरात शिवसेनेचा भगवा फडकला. मिरज, पलूस, कडेगाव या बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेसचे पुरते पानीपत झाले. जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, तर दुसऱ्या बाजूला दोन्ही काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी रणनीती आखली होती. राष्ट्रवादी व काँग्रेसमधील तालुका पातळीवरील नेत्यांना आणि नाराजांना पक्षात खेचण्यात भाजप यशस्वी ठरला. ही खेळी यशस्वी ठरल्यामुळेच जिल्हा परिषदेच्या ६० जागांपैकी २५ जागांवर भाजपला विजय मिळविता आला. काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या बालेकिल्ल्यांना धक्क्यावर धक्के देत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड यांनी पलूस व कडेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठपैकी सहा जागांवर विजय मिळविला. कुंडल गटातील कदम यांचे जावई महेंद्र लाड यांचा राष्ट्रवादी व भाजप आघाडीचे शरद लाड यांनी पराभव केला. मिरज तालुक्यातही भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचे बालेकिल्ले जमीनदोस्त केले. तेथील ११ जागांपैकी कवलापूर, बुधगाव, समडोळी, मालगाव, आरग, म्हैसाळ, बेडग अशा सात जागा भाजपने जिंकल्या. काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधगावची एक जागा जिंकून जिल्हा परिषदेत खाते उघडले आहे. मिरज तालुक्यात काँगे्रसला गटबाजीचा फटका बसला. राष्ट्रवादीला मिरज तालुक्यातून हद्दपारच केले असून, मिरज पूर्वभागात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचाही करिष्मा चालला नाही. खानापूर तालुक्यातही काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अॅड्. बाबासाहेब मुळीक यांची आघाडी चालली नाही.
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तेथील तिन्ही जिल्हा परिषद गटात भगवा फडकवला आहे. शिराळा तालुक्यात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या आघाडीने चारही जागा जिंकत, पंचायत समितीची सत्ताही ताब्यात ठेवली आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी मानसिंगरावांच्या घरातील एक गटाला भाजपमध्ये घेतले, मात्र त्याचा फायदा झाला नाही. आ. नाईक यांना जिल्हा परिषदेच्या चारही जागांसह पंचायत समितीच्या सात जागांवर पराभवाचा धक्का बसला. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सहा जागा आणि पंचायत समिती ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. सर्वपक्षीय रयत विकास आघाडीने वाळवा, कामेरी, येलूर, पेठ जागा मिळवून तालुक्याच्या दबदबा कायम ठेवला आहे. परंतु, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना बागणी गटातून मुलाचा पराभव रोखता आला नाही. बोरगाव गटातून जितेंद्र पाटील यांनी विजय मिळवून काँग्रेसचे अस्तित्व अबाधित ठेवले आहे. जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याचा गड राखला असला तरी, त्यांना मिरज, कडेगाव, आटपाडी, खानापूर, जत तालुक्यात खातेही खोलता आले नाही. चिकुर्डे गटातून शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तेथे राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे पुत्र संजीव पाटील विजयी झाले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी तासगाव तालुक्यातील सहापैकी मणेराजुरी, सावळज, विसापूर, येळावी या चार जागा, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, कुची या जागा राखल्या आहेत. खासदार संजयकाका पाटील यांना तेथे पूर्ण अपयश आले. कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीशी आघाडी केलेल्या माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी देशिंग, रांजणी गट ताब्यात घेतले आहेत. सुमनताई पाटील आणि घोरपडे यांनी कवठेमहांकाळ पंचायत समितीचीही सत्ता मिळवली आहे. खा. पाटील यांना तासगावमध्ये केवळ चिंचणी आणि मांजर्डे गटातील जागा मिळाल्या. आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील मनोमीलनाला लोकांनी साथ दिली आहे. तालुक्यातील सर्व चार जिल्हा परिषद गट आणि सात पंचायत समितीच्या जागा मिळविण्यात भाजपला यश मिळाले. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची तेथे पुरती हार झाली.