कनवाडकरांकडून दोन हजारावर लोकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:10 AM2019-08-12T01:10:13+5:302019-08-12T01:10:18+5:30

सुशांत घोरपडे । लोकमत न्यूज नेटवर्क म्हैसाळ : कृष्णा नदीला आलेल्या महापुरात मिरजेलगतच्या शिरोळ तालुक्यातील कनवाडच्या तरुणांनी अफाट काम ...

From Kanawadkar, the lives of over two thousand people | कनवाडकरांकडून दोन हजारावर लोकांना जीवदान

कनवाडकरांकडून दोन हजारावर लोकांना जीवदान

Next



सुशांत घोरपडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हैसाळ : कृष्णा नदीला आलेल्या महापुरात मिरजेलगतच्या शिरोळ तालुक्यातील कनवाडच्या तरुणांनी अफाट काम करून दाखवलेआहे. दोन हजारावर लोकांना त्यांनी येथे आणून जीवदान दिले आहे.
कनवाड गाव सांगली व कोल्हापूर गावांच्या सीमेवर आहे. पुराने भयभीत झालेल्या कनवाडकरांनी सरकारकडे मोटरबोट मागितली होती. पण प्रशासनाने लक्षच दिले नाही. एकीकडे पुराचे पाणी वाढतच होते. लहान मुले, वयोवृध्द लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अत्यावश्यक वस्तू मिळायच्या बंद झाल्या. गुराढोरांच्या वैरणीचा प्रश्न होता. दूध मिळत नव्हते. वृध्द लोकांची औषधे संपली होती. शेवटी गावातील काही धाडसी तरुण एकत्र आले. त्यांनी हाताने वल्हविण्याची गावातील नाव बाहेर काढली व मदतकार्य सुरू करून कनवाड ते म्हैसाळ (ता. मिरज) अशा फेऱ्या सुरू केल्या. सहा दिवस ते सकाळी सात ते रात्री सातपर्यंत जिवाची पर्वा न करता नाव चालवत आहेत. पुराचे पाणी वाढले असताना, रात्री कनवाडला ही टीम जात आहे.
कनवाडमध्ये गेल्यानंतर रात्री ते पुरात अडकलेल्या लोकांना धीर देतात. म्हैसाळमधून नाव कनवाडला निघताना म्हैसाळमधील शिवराज परिवारातील सदस्य सामाजिक जाणिवेतून कनवाडमध्ये अडकलेल्या ग्रामस्थांना जेवण व औषधे पाठवत आहेत. दोन तासात त्यांची एक फेरी पूर्ण होते. एकावेळी ३० ते ३५ लोकांना म्हैसाळमध्ये आणून पोहोचविले जाते. पाणी पाहून एखादी व्यक्ती चक्कर येऊन पडते. त्यामुळे अशांसाठी त्यांनी नावेत कांदेही ठेवले आहेत. सगळेजण आलटून-पालटून नाव चालवितात. नाव हाकून त्यांच्या हाताला फोड आले आहेत. कनवाडचे पूरग्रस्त पाय धरून त्यांना धन्यवाद देत आहेत.

Web Title: From Kanawadkar, the lives of over two thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.