नेर्लेत महिलेच्या खूनप्रकरणी कापूसखेडच्या प्रियकरास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:25 AM2021-04-12T04:25:20+5:302021-04-12T04:25:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथे १० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मंगल पांडुरंग गुरव (वय ४६, नेर्ले) ...

Kapuskhed's boyfriend arrested in Nerlet woman's murder case | नेर्लेत महिलेच्या खूनप्रकरणी कापूसखेडच्या प्रियकरास अटक

नेर्लेत महिलेच्या खूनप्रकरणी कापूसखेडच्या प्रियकरास अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथे १० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मंगल पांडुरंग गुरव (वय ४६, नेर्ले) या महिलेच्या खुनाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत पोलिसांनी कापूसखेड (ता. वाळवा) येथील प्रियकर अशोक पांडुरंग डेळेकर (वय ४६, रा. कापूसखेड) याला अटक केली. मंगल गुरवने ५० हजार रुपयांची मागणी केल्याने झालेल्या वादात डेळेकर याने डोक्यात दगड घालून तिचा खून केला. ही घटना २ एप्रिलच्या मध्यरात्री घडली.

पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. अशोक हा दररोज मंगलला नेर्ले येथून दुचाकीवरून ती काम करत असलेल्या ठिकाणी नेऊन सोडायचा. तसेच सायंकाळी नेर्ले येथे आणून सोडायचा. यादरम्यान ते वाटेवरील शेतात शरीरसंबंध ठेवत असत. मंगल गुरव हिने २ एप्रिल रोजी सायंकाळी अशोक याला मोबाइलवर कॉल करून बोलावून घेतले. त्यानंतर साडे सातच्या सुमारास ती बाहेर जाऊन येते, असे म्हणून अशोकबरोबर गेली. बहे हद्दीतील पेठ ओढ्याच्या तीरावर दोघे बसले होते. तेथे मंगलने अशोककडे ५० हजार रुपयांची मागणी केली. यातून दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरू होता. राग अनावर झाल्याने अशोक याने तेथील दगडाने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर तिच्याच ओढणीने गळा आवळून ५० फूट अंतरापर्यंत फरपटत नेऊन तिला ओढ्यात टाकले. त्यानंतर अंगावरील कपडे फेकून देऊन तो पहाटे साडे तीनच्या सुमारास बनियन आणि हाफ पँटवर घरी परतला होता.

यादरम्यान ९ एप्रिल रोजी ओढा परिसरात गेलेल्या एका मजुराला हा मृतदेह दिसून आल्यावर पोलिसांना ही घटना समजली. त्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यावर हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी रात्रीच पोलिसांनी मंगल गुरवच्या मोबाइलच्या कॉल डिटेल्सची माहिती मिळवली. त्यातून अशोक डेळेकर याच्याशी सातत्याने झालेल्या संपर्कावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अशोकला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम, अप्पर प्रमुख मनीषा दुबुले यांनी सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव, प्रवीण साळुंखे, हवालदार दीपक ठोंबरे, अरुण पाटील, शरद जाधव, शरद बावडेकर, आलमगीर लतीफ, सचिन सुतार, आनंदा देसाई, अमोल सावंत, भरत खोडकर, किरण मुदूर, सहायक उपनिरीक्षक शशिकांत माने, विनय माळी आणि सायबर सेलचे कॅप्टन गुंडेवार यांनी भाग घेतला.

Web Title: Kapuskhed's boyfriend arrested in Nerlet woman's murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.