करंजेत शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार
By admin | Published: October 3, 2016 12:36 AM2016-10-03T00:36:15+5:302016-10-03T00:36:15+5:30
अल्पवयीन विद्यार्थीही सहभागी : विटा पोलिसांत गुन्हा दाखल
विटा : करंजे (ता. खानापूर) येथील विद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील शिक्षक व एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शेतात व शाळेतीलच एका अडगळीच्या खोलीत अत्याचार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोघांवर रविवारी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुरू व शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खानापूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जी. डी. गायकवाड (रा. शेटफळे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करंजे येथील विद्यालयात तो इंग्रजी विषयाचा शिक्षक आहे. याच विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीला गायकवाड याने दि. २२ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास जेवणाच्या सुटीत घरी जात असताना ‘तुझ्या पप्पांनी तुला बोलावले आहे’, असे खोटे सांगून विद्यालयाच्या बाजूला असलेल्या शेतात नेले. त्यावेळी गायकवाड याच्यासोबत शाळेतील आठवीच्या वर्गातील एक विद्यार्थीही होता.
या दोघांनी शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दि. २७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अत्याचार केलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने मुलीला शाळेतील सातवीच्या वर्गाच्या बाजूला असलेल्या अडगळीच्या खोलीत नेले. घरच्या लोकांना जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. या घटनेनंतर मुलगी शाळेत असताना तिला चक्कर आली. रुग्णवाहिकेतून तिला करंजे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथून तिला विटा येथील खासगी रग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यावेळी मुलीने तिच्या वडिलांना गायकवाड व शाळेतील एका मुलाची भीती वाटत असल्याचे सांगितले. त्यावेळी वडील व तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, मुलीने घडलेली हकीगत सांगितली. याप्रकरणी रविवार, दि. २ आॅक्टोबरला गायकवाड व संबंधित अल्पवयीन संशयिताविरुध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शिक्षक गायकवाड हा फरारी झाला आहे.
दरम्यान, गुरू व शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेचे तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. विटा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांनी रविवारी दिवसभर या प्रकरणाची सखोल चौकशी केली. (वार्ताहर)
गायकवाड फरार
शिक्षक गायकवाड याचे मूळ गाव आटपाडी तालुक्यातील शेटफळे असून, रविवारी पोलिसांनी शेटफळेसह अन्य ठिकाणी गायकवाड याचा शोध घेतला. परंतु, तो फरार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक घोंगडे यांनी सांगितले.